वाचा ‘न्यूज डंका’ एक्स्लुझिव्ह
वसई विरार नगरपालिकेत अनधिकृत बांधकामाचे पेव फुटण्यामागे पालिकेतील प्रमुख अधिकारी कारणीभूत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. येथील उमर कंपाऊंडमधील जुनी झाडे तोडून तिथे अनधिकृत बांधकामे भराभर उभी राहात आहेत. त्यात मिळणारा मलिदा अतिरिक्त आयुक्त आशीष पाटील यांना मिळत असल्याचा आरोप सहआयुक्त मोहन संखे यांनी केल्याचा धक्कादायक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. हा भ्रष्टाचार व्हीडिओच्या मार्फत उघड केला आहे, काँग्रेस पक्षाचे ह्युमन राइट्स पालघर जिल्हाध्यक्ष अल्ताफ सय्यद यांनी. त्यांनी यासंदर्भात वारंवार तक्रारीही केल्या आहेत, पण त्यांच्या तक्रारींना कुणीही दाद देत नाही.शेवटी त्यांनी व्हीडिओ बनवून हे वास्तव समोर आणण्याचा प्रयत्न केला.
या व्हीडिओत सहआयुक्त संखे हेच सांगत आहेत की, या अनधिकृत बांधकामांना अतिरिक्त आयुक्त आशीष पाटील यांचा पूर्ण आशीर्वाद आहे. पालिकेचा इंजीनियरच पैसे गोळा करून पाटील यांना पोहोचवित आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांचेच हात या भ्रष्टाचारात बरबटले असल्यामुळे ही बांधकामे फोफावली आहेत.
हे ही वाचा:
कृषी विभागात ‘वाझे’कडून कोट्यवधींची वसुली सुरु
तुंबलेल्या नदीतील कचरा काढण्याचा खर्च प्रवाही
हाफिज सईदच्या घराबाहेर बॉम्ब स्फोट
परप्रांतीय पुन्हा वळले मुंबईकडे
आपल्याला या विरोधात कारवाई केली जाऊ दिली जात नाही, दबाव येतो, मी आता तयार आहे कारवाई करायला पण अतिरिक्त आयुक्त पाटील यांनी कारवाईसाठी पुढे यावे, त्यांनी जर ती कारवाई केली तर लोक नक्कीच दुवा देतील, असेही सहआयुक्त संखे म्हणतात.
याबाबत अल्ताफ यांनी व्हीडिओत म्हटले आहे की, मी यासंदर्भात तक्रारी केल्या पण कोणतीही कारवाई झाली नाही. त्यासाठीच मी स्टिंग ऑपरेशन करून हे वास्तव जनतेच्या समोर आणले आहे. जेव्हा याविरोधात कुणीही आवाज उठवते तेव्हा त्याला मॅनेज केले जाते. पालिकेकडून छोटी मोठी कारवाई केली जाते. तो दिखावा असतो. लोक तक्रारी करतात. पण पालिका अधिकारी कारवाई करत नाहीत.
अल्ताफ म्हणतात, उमर नगरप्रमाणेच विरार पूर्वेत आनंदी नगर, गुपचर पाडा, फुलपाडा, साकारनगर येथे असंख्य अनधिकृत कामे सुरू आहेत. झाडे तोडून ही कामे सर्रास होत आहेत. या अनधिकृत बांधकामे करणाऱ्या बिल्डरांवर गुन्हा दाखल व्हायला हवा. नगरपालिकेला आदेशही असतात हे बांधकाम तोडण्याचे पण कारवाई होत नाही. उलट या अनधिकृत बांधकामांवर कर्जही उपलब्ध करून दिले जात आहे.
यासंदर्भात सहआयुक्त संखे यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी या अनधिकृत बांधकामांवर आपण उद्या कारवाई करणार असल्याचे ‘न्यूज डंका’शी बोलताना सांगितले. त्यासाठी आवश्यक तो पोलिस बंदोबस्तही मागविण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.
अतिरिक्त आयुक्त आशीष पाटील यांच्याशी मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यांना मेसेज पाठवण्यात आला पण त्यांच्याकडून उत्तर मिळू शकले नाही.