मुंबईमध्ये उभारण्यात आलेले स्कायवॉक हे पांढरे हत्ती ठरलेले आहेत. प्रवाशांना याचा उपयोग तर सोडाच, परंतु निव्वळ बांधून पडून राहिलेले अनेक स्कायवॉक आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळतील.
त्यामुळेच स्कायवॉक हा अनधिकृत फेरीवाल्यांसाठी आंदण दिल्यासारखे झालेले आहेत. गोरेगाव स्टेशनजवळील स्कायवॉक हे याचे उत्तम उदाहरण आहे. गोरेगावमधील एसव्ही रोड हा मुख्य वर्दळीचा रोड मानला जातो. येथील स्कायवॉक हा सध्याच्या घडीला अनधिकृत फेरीवाल्यांचा अड्डा झालेला आहे.
कोरोनाकाळात टाळेबंदीमध्ये तर हा स्कायवॉक म्हणजे अनेकांसाठी घर झालेले होते. येथे अनेक फेरीवाले बस्तान बसवून आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना चालण्यासाठी मोकळी वाट मिळत नाही. शिवाय रात्रीच्या वेळी अनेकदा येथे लाईट नसल्यामुळेही प्रवाशांची चांगलीच पंचाईत होते. त्यामुळेच अनेक तरुण मुलींनी स्कायवॉकपेक्षा रस्त्यावरून जाण्याला पसंती दिलेली आहे.
स्कायवॉकवर तरुण तरुणींचे अश्लील चाळेही रोज दिवसाढवळ्या सुरु असतात. तसेच फेरीवाले याच स्कायवॉकवर त्यांचे जेवण करतात. भांडी धुतात असे अनेक उद्योग या स्कायवॉकवर सुरु असतात. प्रशासन मात्र याबाबत कोणतीही कारवाई करत नसल्याचे आता लक्षात आले आहे. त्यामुळेच अनेक तरुणींनी हा स्कायवॉक न घेता रस्तेमार्गाची निवड केली आहे.
हे ही वाचा:
अरेरे! ‘त्या’ अंगरक्षकाने अखेर बोट गमावले
अनिल परब यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणार
सिद्धार्थच्या निमित्ताने नवी चिंता; युवकांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण का वाढते आहे?
बजबजपुरी! मुंबईतील खड्डे बुजता बुजेना
महिलांच्या सुरक्षेला धोका तसेच उगाच नको त्या कमेंटस् पास करणे हे याठिकाणी सुरु असते. हे लक्षात घेता आता या स्कायवॉकवर महिला पादचारी न जाणे पसंत करत आहेत. तसेच रात्री अनेकदा लाईट नसल्यामुळे चोरीचाही संभव असतो. अशा अनेक गोष्टींमुळे गोरेगावचा स्कायवॉक सध्या चर्चेत आहे. स्कायवॉकवर अस्वच्छता तर आहेच, शिवाय स्थानिकही याबद्दल आता तक्रार करू लागले आहेत. स्थानिकांनी केलेल्या तक्रारीकडे मात्र प्रशासन कानाडोळा करत आहे.