मुंबईसह आता अवघ्या महाराष्ट्रावर मध्यप्रदेशातील सीमेवर घरोघरी सुरू झालेले शस्त्रनिर्मितीचे कारखाने आता डोकेदुखी ठरू लागले आहेत. राज्यातील महानगरांसाठी हा एक धोक्याचा इशारा आहे. तसेच यामुळे गुन्हेगारी कारवाया आता अधिक प्रबळ होतील अशी दाट शक्यता आहे.
राज्याचे गृहमंत्रालय मात्र अजूनही झोपेत आहे का, असाच प्रश्न यामुळे निर्माण होऊ लागलेला आहे. अगदी काहीच दिवसांपूर्वी मुंबईत खुलेआम होणारी ड्रोनविक्री हा मुद्दासुद्धा संवेदनशील होता. परंतु सरकार मात्र सुरक्षेच्या दृष्टीने अजूनही सतर्क नाही हेच निदर्शनास येत आहे.
काही दिवसांपूर्वी घाटकोपर गुन्हे शाखेने मोठ्या प्रमाणात शस्त्रात्रसाठा जप्त केला होता. हा सर्व शस्त्रात्रसाठा मध्य प्रदेशातून मुंबईत आणण्यात आला होता. शस्त्रांस्त्रांची विक्री अगदी खुलेआम होत असल्यामुळे आता कायदा सुव्यवस्था यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परदेशी ब्रॅंण्डची हुबेहुब नक्कल करून या ठिकाणी शस्त्रास्त्रे तयार करण्यात येत आहेत. तसेच ही सर्व शस्त्रास्त्रे कमी किमतीत विकली जातात, त्यामुळे यांना मागणीही भरपूर आहे. हा सर्व प्रकार महाराष्ट्राच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय धोकादायक ठरू शकतो, अशी माहिती गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राशी बोलताना दिली.
हे ही वाचा:
शाळा सुरू करण्याबाबत ठाकरे सरकारची ढकलगाडी सुरूच
ठाकरे सरकार मेट्रो कारशेड कुठे बांधणार?
विजयी भव! पंतप्रधान साधणार भारताच्या ऑलिम्पिक चमूशी संवाद
काही दिवसांपूर्वी दहिसरमध्ये सराफा दुकानदाराची झालेली हत्या याच शस्त्रसाठ्याशी संबंधित आहे. या गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेली शस्त्रे मध्य प्रदेशातून विकत आणण्यात आलेली होती, अशी माहिती दहिसरचे वरिष्ठ निरीक्षक प्रवीण पाटील यांच्याकडून मिळाली.
बिहारमधील मुंगेर नंतर आता मध्यप्रदेशातील पळसूद हे गाव शस्त्रनिर्मितीचे केंद्र झाले आहे. गुन्हे शाखेकडून कारवाई होताच, स्थानिक पोलिसांनी पळसूदमध्ये छापा घातला. तसेच त्याठिकाणची यंत्रसामग्री जप्त केली. मात्र पोलिसांचा छापा पडताच येथील शस्त्रनिर्माते दडण्यासाठी वेशीवरील नदी ओलांडून महाराष्ट्रात येतात, अशी धक्कादायक माहिती आता पुढे आली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये या शस्त्रांच्या मदतीने गुन्हे घडण्याची दाट शक्यता आता वाढलेली आहे. वेळीच या गोष्टीला यंत्रणांनी आवर घातला नाही तर, महाराष्ट्रातही दिवसाढवळ्या शस्त्रांचा वापर राजरोसपणे सुरू होईल.