जालना जिल्ह्यातील समर्थ रामदासांच्या देवघरातून प्राचीन मूर्ती चोरणाऱ्यांचा अखेर दोन महिन्यांनी शोध लागला आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, मुख्य आरोपीचा शोध सुरु असल्याची माहिती आहे. पोलिसांनी अटक केलेल्या दोन आरोपींकडून समर्थांच्या देवघरातील हनुमानाच्या मूर्ती जप्त करण्यात आल्या आहेत.
जालनामधील समर्थ रामदासांच्या जन्मगावी ‘जांब समर्थ’ येथील राम मंदिरातून ऐतिहासिक मूर्ती ऑगस्ट महिन्यात चोरीला गेल्या होत्या. मंदिरातून ४५० वर्षापूर्वीच्या ऐतिहासिक मूर्ती चोरीला गेल्याने एकच खळबळ माजली होती. याप्रकरणी तपासात पोलिसांना दोन महिन्यांनी यश आले आहे. एका आरोपीला कर्नाटकमधून तर दुसऱ्या आरोपीला सोलापूरमधून अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी अजून फरार असून, पोलिसांना मुख्य आरोपीबद्दल महत्वाची माहिती मिळाली आहे.
दोन्ही चोरटयांनी समर्थांच्या देवघरातील छोट्या मूर्तींची अवघ्या २५ हजाराला विक्री केली आहे. ज्यांना त्या मूर्ती विकल्या आहेत त्यांच्याकडून पोलिसांनी मूर्ती हस्तगत केल्या आहेत. मुख्य आरोपी हा देवघरातील मुख्य मूर्ती घेऊन फरार आहे. मात्र त्यालाही लवकर अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींची नवी संकल्पना ‘एक देश, एक पोलीस गणवेश’
आता टाटा प्रकल्पाचे खापरही शिंदे फडणवीस सरकारच्या डोक्यावर
अंधेरी पोटनिवडणूक रद्द करण्याची मागणी
मुंबई रेल्वे पोलिसांचे ट्विटर अकाउंट हॅक
मूर्ती चोरून त्या विकून त्यातून फक्त पैसे कमवायचे, हाच हेतू आरोपींचा होता. गेल्या दोन महिन्यांपासून पोलीस या आरोपींचा शोध घेत होते. अखेर गुरुवार, २७ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा पोलिसांना दोघांना अटक केली आहे. देवघरातील छोट्या मूर्ती मिळाल्या असून, मूर्ती मिळणे बाकी आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. परंतु पोलिसांनी किती मूर्ती मिळाल्या किती शिल्लक आहेत याची स्पष्ट माहिती दिलेली नाही.