मुंबई महानगरपालिकेतील कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी ईडीने पुन्हा आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांना समन्स बजावण्यात आले आहे. तसेच चौकशीसाठी शुक्रवारी ईडी कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना जयस्वाल यांना देण्यात आल्या आहेत. ईडीने संजीव जयस्वाल यांना दुसऱ्यांदा समन्स बजावले असून ते चौकशीसाठी हजर राहिल्यास महापालिकेतील आणखी अधिकाऱ्यांची नावे बाहेर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांना ईडीने २२ जून रोजी समन्स बजावले होते. कोविड घोटाळा प्रकरणात त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, संजीव जयस्वाल तेव्हा ईडीसमोर हजर झाले नाहीत. त्यांनी ईडीसमोर हजर राहण्यासाठी चार दिवसांची मुदत मागितली होती. त्यामुळे ईडी लवकरच त्यांना दुसरे समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार ईडीने संजीव जयस्वाल यांना समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
बुधवार, २१ जून रोजी ईडीने मुंबईत आणि पुण्यात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्ती असलेल्या लोकांवर १५ हून अधिक ठिकाणी छापेमारी केली होती. ईडीच्या छापेमारीमुळे उद्धव ठाकरेंसह ठाकरे गटाच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याच्या चर्चा आहेत. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती सुरज चव्हाण यांच्या चेंबूर येथील निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. त्यावेळी त्यांनी त्यांच्या घरातून काही कागदपत्रे जप्त केली होती. त्यानंतर सूरज चव्हाण यांना ईडीने समन्स बजावले असून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले.
हे ही वाचा:
वीरेंद्र सेहवाग म्हणतो, यंदाचा वर्ल्डकप विराटसाठी जिंका!
मागाठाणे जमीन खचल्याप्रकरणी दोघाना अटक व जामीन
देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटाला पवारांचे गोलमोल उत्तर
येणार तर ‘नरेंद्र मोदीचं’; नितीन गडकरी यांची ‘भविष्यवाणी’ !
सुजीत पाटकर यांच्या लाईफलाईन कंपनीला बेकायदेशीर कंत्राट देण्यात आलं होतं. ते संजय राऊत यांचे खास असून त्यांच्या आशीर्वादानेचं त्यांना कंत्राट मिळाल्याचा आरोप करण्यात आला होता. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण उचलून धरले होते.