वरळी हिट अँड रन प्रकरणात महिलेचा मृत्यू झाला असून राज्यभरातून या घटनेबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच मिहीर शाह याच्यासोबत आणखी १२ जणांना अटक करण्यात आली. आरोपी मिहीरला अटक झाल्यानंतर रात्री उशिरा गुन्हे शाखा ३ मध्ये मिहीरसोबतच आई, दोन बहिणी आणि मित्रांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.
वरळी हिट अँड रन प्रकरणात आरोपी मिहीर शाहने आपणच गाडी चालवत असल्याची कबुली दिली आहे. तर, मिहीरच्या बहिणीनेही कबुली देताना म्हटले आहे की, या घटनेनंतर आम्ही घाबरलो, आमच्यावर हल्ला होईल, या भीतीने आम्ही घर सोडले.
मिहीर आणि त्याचे कुटुंब दोन गाड्यांनी शहापूरला गेले. शहापूरला एका पंजाबी व्यक्तीने त्यांची शहापूरला राहण्याची व्यवस्था केली. या पंजाबी व्यक्तीचे शाह कुटुंबियाशी जुनं आणि घरचे संबध असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. तसेच फरार होण्यापूर्वी आरोपीने दाढी काढली असल्याचे सांगितले जात आहे. जेणेकरून त्याला ओळखता येणार नाही. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपीनं आपणच ड्रायव्हिंग सीटवर असल्याची कबुली दिली आहे. मिहीर याला बुधवारी दुपारी न्यायालयात हजर केलं जाणार असून पुढील तपासासाठी पोलीस आरोपींची कोठडी मागणार आहेत. तसेच, पोलिसांनी मिहीरच्या रक्ताचे नमुने घेतले आहेत.
हे ही वाचा:
‘आम आदमी’ राजकुमार आनंद बसपातून भाजपात !
ऑस्ट्रियात पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी वाजले ‘वंदे मातरम’
राहुल द्रविड म्हणाला, मला ५ कोटी नको, अडीच कोटीच द्या!
जॅकलिनमागे ईडी पिडा सुरूच, पुन्हा नोटीस
दरम्यान, वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाहचे वडील, राजेश शाह यांची शिवसेना उपनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. वरळी हिट अँड रन अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून राजेश शाह यांची शिवसेना उपनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.