लग्नानंतर अवघ्या महिन्याभरात एका अल्पवयीन नवऱ्याने आपल्या बायकोलाच विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी संबंधित प्रकाराची तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघड झाले. त्यानंतरही मुलीला विकत घेणाऱ्या व्यक्तीच्या गावकऱ्यांनी “आम्ही तिला विकत घेतलंय, सोडणार नाही”, असे म्हणत पोलिसांनाच आडकाठी करण्याचा प्रयत्न केला.
एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने जुलै महिन्यात ओडीशामध्ये या पीडित अल्पवनीय मुलीशी विवाह केला होता. त्यानंतर कामासाठी म्हणून तो तिला घेऊन रायपूर, झाशी मार्गे राजस्थानमध्ये आला. इथे वीटभट्टीवर त्याने काम करायला सुरुवात केली. मात्र, महिन्याभरातच त्याने आपल्या पत्नीला राजस्थानच्या बारन जिल्ह्यातल्या एका गावात राहणाऱ्या ५५ वर्षीय वयोवृद्धाला विकले.
आरोपी पतीने आपल्या पत्नीचा १ लाख ८० हजार रुपयांना सौदा केला. ऑगस्ट महिन्यात पत्नीला विकल्यानंतर जेव्हा हा आरोपी आपल्या गावी परत गेला, तेव्हा मुलीच्या कुटुंबीयांनी मुलीबाबत विचारणा केली असता त्यावर तिनेच आपल्याला सोडल्याचा बनाव त्याने केला. कुटुंबीयांना संशय आल्यामुळे त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीच्या मोबाईलमधील कॉल रेकॉर्ड तपासल्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला.
हे ही वाचा:
‘या’ राज्यात काँग्रेस सरकार करणार मदरशांचा ९० टक्के खर्च
काय आहे भारताची ‘अभ्यास’ मिसाईल?
दुबई-जम्मू-काश्मीर करार हे भारतासाठी मोठे यश
…तर ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी करणार आंदोलन
दरम्यान, आरोपीने आपल्या पत्नीला विकून त्या पैशातून एक स्मार्टफोन विकत घेतल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच, पंचतारांकित हॉटेल्समध्ये जेवल्याचे देखील त्याने सांगितले. आरोपीच्या चौकशीनंतर पीडित मुलीचा ठावठिकाणा समजल्यानंतर पोलिसांनी तातडीने राजस्थानच्या बरन जिल्ह्यात धाव घेतली. त्यानंतर ज्या गावात मुलीला विकण्यात आले होते, तिथल्या गावकऱ्यांनी चक्क पोलिसांना तिला घेऊन जायला विरोध केला. ‘आम्ही तिला १ लाख ८० हजार रुपये देऊन विकत घेतले आहे. त्यामुळे आम्ही तिला घेऊन जाऊ देणार नाही,’ असे गावकऱ्यांनी सांगितले. अखेर कायद्याचा दणका देत या मुलीला सोडवण्यात आले.
संबंधित आरोपीला न्यायालयासमोर सादर केल्यानंतर त्याची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, या अल्पवयीन मुलीला विकत घेणाऱ्या ५५ वर्षीय वृद्धावर कोणती कारवाई झाली, याची माहिती मिळू शकलेली नाही.