भररस्त्यात पत्नीवर चाकूने हल्ला करून ३२ वर्षीय पतीने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे सोमवारी सकाळी घडली. या घटनेत पती-पत्नी दोघेही जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी जी.टी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी व्ही.पी. रोड पोलिसांनी पतीविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर हल्ला केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
शीतल भोसले (३०) आणि सागर भोसले (३२)असे या दाम्पत्याचे नाव आहे. सागर हा ठाण्याला राहण्यास असून पत्नी ही माहेरी नालासोपारा येथे राहण्यास आहे. सागर हा खाजगी कंपनीत नोकरी करीत असून शीतल ही गिरगाव खाडिलकर रोड येथे एका वेडिंग कार्ड दुकानात कामाला आहे. सागर हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्यामुळे दोघात होणाऱ्या सततच्या वादाला कंटाळून शीतल ही माहेरी नालासोपारा येथे राहण्यास आली होती.
शीतल ही सोमवारी सकाळी गिरगाव येथे कामावर जात असताना संशयाने पछाडलेल्या सागर हा तिचा पाठलाग करत गिरगाव येथे आला, व त्याने भररस्त्यात शितलवर धारदार शस्त्राने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, दरम्यान स्थानिकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता सागर ने स्वतःच्या हातची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला.
हे ही वाचा:
भारतीय महिला टेबल टेनिस संघाची कमाल, रोमानियाचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत केला प्रवेश !
आसामनेही मनावर घेतले… आता लाडक्या बहिणींसाठी लव्हजिहाद विरोधी कायदा हवा!
बांगलादेशात आंदोलकांनी ‘बंगबंधू शेख मुजीबुर रहमान’ यांचा पुतळा फोडला !
सेन्सेक्स २,५०० अंकांनी घसरला, निफ्टीतही घसरण
घटनास्थळी दाखल झालेल्या व्ही.पी.रोड पोलिसांनी शीतल आणि सागरला उपचारासाठी गोकुलदास तेजपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी व्ही.पी.रोड पोलिसांनी सागर भोसले विरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.