भरपूर पगाराच्या नोकऱ्या देण्याच्या आमिषाने भारतातील तरुणांना रशिया युक्रेन युद्धभूमीवर नेणारे मानवी तस्करीचे नेटवर्क केंद्रीय गुन्हे अन्वेषण खात्याने (सीबीआय) उद्ध्वस्त केले. सीबीआयने दिल्ली, त्रिवेंद्रम, मुंबई, अंबाला, चंदीगढ, मदुराई व चेन्नई येथे यासंदर्भात सीबीआयने छापेमारी केली. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार व्हिसा देणाऱ्या विविध फर्मस आणि एजन्टवर एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.
हैदराबाद येथे ३० वर्षीय युवक मोहम्मद अफसानची फसवणूक करून त्याला रशियाला पाठविण्यात आले. रशियन लष्करात नोकरी देण्याच्या आमिषाने त्याच्याकडून लाखो रुपये घेण्यात आले आणि त्याला तिथे पाठवण्यात आले. तो तिथे सुरू असलेल्या युक्रेनविरुद्धच्या युद्धात मारला गेला. याआधी गुजरातमधील हमिल मंगुकिया हादेखील याच युद्धात मारला गेला. आठवड्याभरापूर्वी मंगुकियाचा मृत्यू झाला होता.
हे ही वाचा:
कुलदीप, अश्विनने इंग्लंडला घातला लगाम
केरळचे माजी मुख्यमंत्री करुणाकरन यांची कन्या भाजपात?
उत्तर प्रदेशातील १३ हजार मदरसे बंद करण्याची शिफारस
धरमशाला कसोटीत कुलदीप यादवने ‘करून दाखवले’
अफसानचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा भाऊ मोहम्मद इम्रानने मॉस्को दूतावासाशी एक्सच्या माध्यमाने संपर्क केला. अफसानचा मृत्यू झालाचा पुरावा त्याने मागितला. त्याने आपल्या भावाला आणण्यासाठी मॉस्कोला जाण्याचीही तयारी केली होती. त्यानंतर मॉस्को दूतावासाकडून त्यांना फोन करण्यात आला आणि अफसानचा मृत्यू झालेला असल्याची बातमी देण्यात आली. पण अफसानला तिथे पाठविणाऱ्या एजन्टने तो जिवंत असल्याचे म्हटले होते. मंगळवारपर्यंत आपण त्याबाबत पुरावे देईन असेही या एजन्टने म्हटले होते.
मेसर्स २४×७ आरएएस ओव्हरसीज फाउंडेशन, केजी मार्ग, नवी दिल्ली, मेसर्स ओएसडी ब्रदर्स ट्रॅव्हल्स अँड व्हिसा सर्व्हिस प्रा. लिमिटेड मुंबई मुंबई, मेसर्स ॲडव्हेंचर व्हिसा सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, चंदीगड, पंजाब,बाबा व्लॉग्स ओव्हरसीज रिक्रूटमेंट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, दुबई या कंपन्यांच्या समावेश आहे. सुयश मुकुट,राकेश पांडे,मनजीत सिंग,आणि फैसल अब्दुल मुतालिब खान उर्फ बाबा हे या कंपन्यांचे संचालक आहेत. या कंपन्या परदेशात किफायतशीर नोकऱ्या देण्याच्या नावाखाली भारतीय तरुणांना लक्ष्य करून देशभरात मानवी तस्करीचे मोठे नेटवर्क चालवत होते.
हे तस्कर एक संघटित नेटवर्क म्हणून कार्यरत आहेत आणि ते भारतीय नागरिकांना युट्युब इत्यादी सोशल मीडिया चॅनेलद्वारे तसेच त्यांच्या स्थानिक संपर्क आणि एजंटद्वारे रशियामध्ये उच्च पगाराच्या नोकऱ्यांसाठी आमिष दाखवत होते. त्यानंतर, तस्करी झालेल्या भारतीय नागरिकांना युद्धाच्या भूमिकेत प्रशिक्षण देऊन त्यांच्या इच्छेविरुद्ध रशिया – युक्रेन युद्ध क्षेत्रामध्ये युध्द भूमीवर तैनात करण्यात येत होते. अनेक तरुण या मानवी तस्करीच्या जाळ्यात अडकले होते व त्यांनी आपले आयुष्य धोक्यात घातले, युद्धभूमीवर अनेक भारतीय तरुणांचा बळी देखील गेला असून अनेक तरुण गंभीर जखमी झाल्याचे आढळून आले आहे.उत्तम रोजगार आणि उच्च पगाराच्या नोकऱ्यांच्या नावाखाली रशियाला भारतीय नागरिकांची तस्करी करताना आढळून आलेल्या कंपन्यावर या प्रकरणी सीबीआयने खाजगी व्हिसा कन्सल्टन्सी फर्म आणि एजंट आणि इतरांविरुद्ध मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
६ मार्च रोजी सीबीआयकडून खाजगी व्हिसा कन्सल्टन्सी फर्म आणि एजंट आणि इतरांविरुद्ध मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कंपन्यांच्या एजंटांचे मानवी तस्करीचे जाळे देशभरातील अनेक राज्यांमध्ये पसरलेले आहे. सीबीआय दिल्ली, त्रिवेंद्रम, मुंबई, अंबाला, चंदीगड, मदुराई आणि चेन्नई येथे जवळपास १३ ठिकाणी एकाचवेळी शोध घेत आहे. आतापर्यंत रोख रक्कम ५० लाख, लॅपटॉप, मोबाईल, डेस्कटॉप, सीसीटीव्ही फुटेज आदी गुन्ह्यांची कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड जप्त करण्यात आले आहेत.तसेच काही संशयितांना विविध ठिकाणांहून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. आतापर्यंत परदेशात पाठवलेल्या पीडितांच्या जवळपास ३५ घटना समोर आल्या आहेत. तस्करीच्या अधिक बळींचीही ओळख पटवली जात आहे. तपास सुरू आहे.
अफसानप्रमाणेच भारतातील अनेक युवकांना मोठ्या पगाराचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळण्यात आले आहेत. त्यांना रशियाला पाठविण्यात आले पण तिथे ते रशियन लष्करात दाखल होणार याचे कोणतेही पुरावे नव्हते. सध्या असे २० भारतीय रशियात प्रतीक्षा करत आहेत. सरकार त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.