ठाकूर कंपनीचे पैसे फिरवायचा मदन चतुर्वेदी

ठाकूर कंपनीचे पैसे फिरवायचा मदन चतुर्वेदी

‘विवा’ समुहासाठी पैसे फिरवणाचे काम करणाऱ्या मदन चतुर्वेदीला ताब्यात घेतल्यामुळे ईडीला पैशांच्या स्त्रोताच्या माहितीचे घबाड मिळण्याची शक्यता आहे. मदन हा ‘विवा’च्या अनेक कंपन्यांमध्ये डायरेक्टर आहे. ‘विवा’कडे येणारा काळा पैसा रिचवण्याची जबाबदारी त्याच्यावर होती असे समजते.

एचडीआयएल आणि अन्य कंपन्यांमार्फत हवालाने येणारा काळा पैसा फिरवण्यासाठी ‘विवा’ समुहाने अनेक कंपन्या स्थापन केल्या होत्या. यापैकी एक असलेल्या ‘विवा होल्डींग एण्ड युनिवर्सल टूर एण्ड टुरीझम’ या कंपनीने ‘मुसाफिर डॉट कॉम’ या यूएईच्या कंपनीशी भारतात टायअप केले होते. आज ईडीने ताब्यात घेतलेला मेहूल ठाकूर या कंपनीचा डायरेक्टर होता.

या कंपनीने ‘मुसाफीर’चा ब्रँड अँबॅसॅडर म्हणून २०१३ साली चक्क क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर याची नियुक्ती केली होती.

ईडीने शुक्रवारी ‘विवा’ समुहाच्या पाच ठिकाणांवर धाडी घातल्या. आजही ती कारवाई सुरू आहे. ईडीने मेहूल ठाकूर आणि मदन चतुर्वेदी या दोन डायरेक्टरना चौकशीसाठी ताब्यात घेतले. १९९० नंतर  ठाकूर कुटुंबियांची मालकी असलेल्या ‘विवा’ समूहाकडे मोठ्या प्रमाणात बिल्डरांचा काळा पैसा येऊ लागला. त्याच्यामध्ये मोठा हिस्सा एचडीआयएलकडून येणाऱ्या पैशाचा होता आणि हा काळा पैसा फिरवण्यासाठी ‘विवा’ने अनेक कंपन्या स्थापन केल्या होत्या. मेहूल ठाकूर आणि मदन चतुर्वेदी हे त्यापैकी अनेक कंपन्यांच्या बोर्डावर होते. ‘विवा’ समूहाने स्थापन केलेली ‘विवा’ होल्डींग एण्ड युनिवर्सल टूर एण्ड टुरीझम ही कंपनी त्यापैकी एक.

‘विवा’ च्या पर्यटन उद्योगात वापरण्यात येणऱ्या गाड्यांची हवालाच्या पैशाची ने-आण करण्यासाठी वापर होत असे असा पोलिसांना संशय होता. परंतु यावर कधी कारवाई झाली नाही. ईडीच्या तपासानिमित्त या गोष्टी उघड होतील अशी शक्यता आहे.

‘विवा’ समुहाकडे येणारा पैसा फिरवण्याचे काम मदन चतुर्वेदी करत होता. चतुर्वेदीला ईडीने ताब्यात घेतल्यामुळे ठाकूर कंपनीचे माहितीचे स्त्रोत उघड करणे ईडीला सोपे होणार आहे.

Exit mobile version