१५ वर्षांपासून सुरू असलेल्या जमिनीच्या वादाचे पर्यवसान गँगवॉरमध्ये आणि नोएडातील एका व्यक्तीच्या हत्येत झाल्याचे उघड झाले आहे. शुक्रवारी नोएडात सुरज मान याची हत्या करण्यात आली होती. या हत्येचे कारण १५ वर्षांपासून सुरू असलेला दिल्लीतील १०० यार्ड जमिनीचा वाद असल्याचे उघड झाले आहे.
नोएडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज मान हा मूळ दिल्लीतील उत्तर पश्चिम जिल्ह्यातील खेरा खुर्द गावाचा रहिवासी होता. तो एअर इंडियाचा कर्मचारी होता. तो गँगस्टर परवेश मान याचा भाऊ होता. या परवेश मान याचे गँगस्टर कपिल मान उर्फ कल्लू याच्याशी शत्रुत्व होते. दोघेही गँगस्टर एकाच गावाचे होते आणि त्या दोघांच्या कुटुंबांमध्ये गेल्या १५ वर्षांपासून १०० चौरस यार्ड जमिनीच्या तुकड्यावरून वाद सुरू होते. हा वाद टोकाला जाऊन दोन्ही कुटुंबांमध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
हे ही वाचा:
भारतीय विमान वापरण्यास मुईझ्झुनी परवानगी नाकारली; मालदीवच्या मुलाचा मृत्यू
राम मंदिरासाठी भेट म्हणून भाविकाने दिले १०१ किलो सोने!
तामिळनाडू सरकारने प्राण प्रतिष्ठाच्या थेट प्रक्षेपणावर बंदी घातली?
जय श्रीरामच्या घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या शिक्षकाला अटक
दोन्ही कुटुंबांमधील सदस्यांची हत्या
सन २०१७मध्ये कपिलचे काका सूर्या प्रकाश यांची हत्या झाली. दोन वर्षांनी सन २०१९मध्ये परवेशचा चुलतभाऊ अनिल मान आणि काका विरेंद्र मान याची हत्या कपिलच्या गँगने केल्याचा आरोप झाला. परवेशचा मित्र मनीष मान याच्यावरही तब्बल १९ ते २० वेळा गोळीबार करण्यात आला आहे. मात्र प्रत्येकवेळी तो बचावला आहे. त्यानंतर सन २०२२मध्ये कपिलचे वडील, वेद प्रकाश यांची परवेशच्या गँगने हत्या केल्याचा आरोप झाला. त्यामुळे वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी सूरज मान याची हत्या असावी, असे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. शुक्रवारी हत्या झाल्यानंतर पोलिसांची चार पथके दिल्ली एनसीआरमध्ये तैनात करण्यात आली असून समारे २०० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत.
सूरज मानच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यातील एक कपिल याचा भाऊ धीरज मान असून दुसरा अरुण उर्फ मन्नू मान आहे. हे दोघे कपिल याच्या वडिलांच्या हत्येचे साक्षीदार आहेत. गोळीबारात सहभागी असलेल्या आणखी एकाची ओळख पटली असून पोलिस त्यालाही लवकरच पकडतील, अशी माहिती पोलिसांनी दिली. सूरज हा नोएडा सेक्टर १०४ येथील हाजिपूर येथे जिममध्ये गेला होता. तो जिममधून निघाल्यावर गाडीत असतानाच त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.