दिल्लीतील सराफाच्या दुकानातून २५ कोटी रुपयांच्या चोरीप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. एवढ्या मोठ्या लुटीचा कट यातील एकट्याने तडीस नेला होता, असे पोलिसांच्या चौकशीतून उघड झाले आहे. लुटीचा कट अंमलात आणण्यासाठी त्याने आधी रेकी केली होती. त्यानंतर लूट करून तो बिलासपूरला पोहोचला होता.
पोलिसांनी सांगितले की, लोकेश श्रीवास एकटाच बसमधून दिल्लीत आला होता आणि रविवारी, २४ सप्टेंबर रोजी शेजारच्या इमारतीमधून रात्री ११ वाजता सराफाच्या दुकानात घुसला होता आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी संध्याकाळी सात वाजता त्याच रस्त्याने बाहेर पडला. त्यानंतर रात्री आठ वाजून ४० मिनिटांनी लोकेश दिल्लीतील काश्मिरी गेट बस स्टँडवर पोहोचला. त्यानंतर त्याने लुटीचे सामान ठेवण्यासाठी एक बॅग खरेदी केली. या चोरीचा माग काढण्यासाठी पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आणि खबऱ्यांची मदत घेतली.
हे ही वाचा:
विसर्जन सोहळ्यादरम्यान हरवलेल्या २२ मुलांना पालकांकडे सोपवले!
रविवारी राज्यभर स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे महाराष्ट्राकडे तीन वर्षांसाठी येणार!
कोविड सेंटरमधील घोटाळयाकडे दुर्लक्ष करण्यासाठी अधिकाऱ्यांना वाटले ६० लाखांचे सोने
ही लूट करणारे चोर छत्तीसगढमध्ये लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, दिल्ली पोलिसांनी छत्तीसगढ पोलिसांना कळवले. त्यानंतर छत्तीसगढ पोलिसांनी मुख्य आरोपी लोकेश श्रीवास याला अटक केली. तसेच, त्याच्यासह शिवा चंद्रवंशी आणि दोघांना अटक केली. पोलिसांच्या नोंदीनुसार, ते सराईत चोर असून त्यांनी याआधीही छत्तीसगढ आणि आंध्र प्रदेशात अनेक चोऱ्या केल्या आहेत.
हा चोर दुकानाचे छप्पर कापून दुकानात घुसला होता. त्याने शोरूमच्या पहिल्या मजल्यावर जाऊन छप्पराचे कुलूप तोडले. त्यानंतर तो खाली आला. त्यानंतर त्याने स्ट्राँग रूमच्या भिंतीला छिद्र पाडून सीसीटीव्ही कनेक्शन तोडले. स्ट्राँग रूमच्या भिंती लोखंडाच्या होत्या, तरीही चोराने त्या कापल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जेव्हा पोलिसांनी लोकेशच्या घरी छापा मारला, तेव्हा त्याच्या घरात दागिनेच दागिनेच होते. हे दागिने चादरी आणि बॅगांमध्ये लपवण्यात आले होते. पोलिसांनी चोरांकडून १८ किलो सोने आणि साडेबारा लाख रोख रक्कम जप्त केली आहे. तर, शिवा चंद्रवंशीच्या घरात दागिन्यांसह २८ लाखांची रोख रक्कम सापडली.