पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू- काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी आक्रमक भूमिका घेत दहशतवादी विरोधी कारवायांना वेग दिला आहे. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांच्या घरांना उध्वस्त करण्याची मोहीम सुरक्षा दलांनी हाती घेतली आहे. आतापर्यंत माहितीनुसार, पाच संशयित दहशतवाद्यांची घरे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. शुक्रवारी रात्री जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या (एलईटी) कमांडरसह पाच दहशतवाद्यांची घरे उध्वस्त करण्यात आली. शोपियान, कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी हल्ल्याशी संबंधित संशयितांवर कारवाई केली आहे.
शोपियानच्या छोटीपोरा गावात, लष्कर-ए-तोयबाचा कमांडर शाहिद अहमद कुट्टे याचे घर उध्वस्त करण्यात आले. कुट्टे हा गेल्या तीन ते चार वर्षांपासून दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय आहे आणि देशविरोधी कारवायांमध्ये समन्वय साधण्यात त्याची प्रमुख भूमिका असल्याचा आरोप आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. कुलगामच्या माटलम भागात जाहिद अहमद या सक्रिय दहशतवाद्याचे आणखी एक घर पाडण्यात आले. तर, पुलवामाच्या मुरान भागात, एक दहशतवादी अहसान उल हकचे घर स्फोटाने जमीनदोस्त करण्यात आले. २०१८ मध्ये पाकिस्तानमध्ये दहशतवादी प्रशिक्षण घेतलेला अहसान अलीकडेच खोऱ्यात पुन्हा दाखल झाला होता. जून २०२३ पासून सक्रिय असलेला लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी एहसान अहमद शेख याचे आणखी एक दुमजली घर पाडण्यात आले. पुलवामाच्या काचीपोरा भागात झालेल्या स्फोटात पाचवा दहशतवादी हरिस अहमद याचे घरही उध्वस्त झाले. हा २०२३ पासून दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय आहे. सर्व दहशतवाद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचीही माहिती आहे.
हे ही वाचा :
पाकिस्तानची मग्रुरी सुरूचं; नियंत्रण रेषेवर विविध ठिकाणी गोळीबार
पहलगामचा कट पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिजला?
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींच्या कुटुंबियांना एनएसईकडून १ कोटी रुपयांची मदत!
तेलंगणात १४ माओवाद्यांचे आत्मसमर्पण!
यापूर्वी गुरुवारी रात्री, पहलगाम हल्ल्यामागे असलेले लष्कर-ए- तोयबाचे दोन दहशतवादी आदिल हुसेन ठोकर आणि आसिफ शेख यांची घरेही उध्वस्त करण्यात आली. अनंतनाग पोलिसांनी गुरुवारी पहलगाम हल्ल्यात सहभागी असल्याचा संशय असलेल्या ठोकर आणि इतर दोन दहशतवाद्यांचे रेखाचित्र जारी केले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, इतर दोन संशयित हाशिम मुसा उर्फ सुलेमान आणि अली भाई उर्फ तल्हा भाई हे पाकिस्तानी नागरिक आहेत आणि त्यांच्या अटकेसाठी माहिती देणाऱ्याला २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.