देशाचे राजधानीचे शहर दिल्लीतील अनेक पत्रकारांच्या आणि लेखकांच्या घरी पोलिसांच्या विशेष पथकाने छापे टाकल्याची माहिती समोर आली आहे. पत्रकार अभिसार शर्मा यांच्यासह संजय राजोरा, भाषा सिंह, उर्मिलेश, प्रबीर पुरकायस्थ, सोहेल हाश्मी यांच्या घरीही पोलिसांनी धाड टाकली आहे. शिवाय अनेक पत्रकारांचे मोबाईल, लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. हे सर्व पत्रकार न्यूज क्लिकशी संबंधित आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी चिनी फंडिंग संदर्भात आरोप न्यूज लिंकवर करण्यात आले होते. त्यानंतर ईडीनं एक केसही दाखल केली होती.
‘न्यूज क्लिक’ या वृत्तसंस्थेवर चिनी फंडिंगचे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर मंगळवार, ३ ऑक्टोबर रोजी सकाळपासून दिल्ली पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या संस्थेशी संबंधित अनेक पत्रकारांची पोलिसांनी चौकशी केली आहे. पत्रकार अभिसार शर्मा, संजय राजोरा, प्रबीर पुरकायस्थ, भाषा सिंह, उर्मिलेश, सोहेल हाश्मी यांच्या घरी पोलिसांनी धाड टाकली आहे. यापूर्वी ऑगस्टमध्ये ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास करताना ‘न्यूज क्लिक’चे मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ यांचा दिल्लीतील फ्लॅट जप्त केला होता.
संबंधित वृत्तसंस्थेला काम करण्यासाठी चीनकडून निधी मिळत असल्याचा आरोप केला जात आहे. दिल्लीशिवाय नोएडा आणि गाझियाबादमध्येही पोलीस अनेक ठिकाणी शोध घेत आहेत. दिल्ली पोलिसांनी UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर जवळपास ३८ कोटींचे फंडिंग चीनकडून आल्याचा आरोप केला जात आहे. पोलिसांनी तपासादरम्यान अनेक डिजिटल पुरावेही जप्त केले आहेत. यामध्ये लॅपटॉप, मोबाईल फोन आणि हार्ड डिस्कचाही समावेश आहे.
अभिसार शर्मा यांनी ट्विट केले आहे की, “दिल्ली पोलीस सकाळी माझ्या घरी पोहोचले आणि माझा लॅपटॉप, मोबाईल जप्त केला आहे.” तर, पत्रकार भाषा सिंह यांनीही ट्वीट करून माहिती दिली आहे. “हे माझं शेवटचं ट्वीट आहे. दिल्ली पोलिसांनी माझा मोबाईल जप्त केला आहे.” असे त्यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
घुस के मारणारा अज्ञातांचा वॅगनर ग्रुप…
ट्रॅकवर दगड, लोखंडी रॉड ठेवून वंदे भारतला अपघात घडविण्याचा कट!
‘जयशंकर हे आधुनिक भारत-अमेरिकी संबंधांचे शिल्पकार’
गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरे काय म्हणाले?
प्रकरण नेमकं काय?
‘न्यू यॉर्क टाईम्स’मधील एका रिपोर्टमध्ये नेव्हिल रॉय सिंघम याने ‘न्यूज क्लिक’या संस्थेला आर्थिक मदत केली. तसेच त्याचा संबंध चिनी कम्युनिस्ट पक्षाशी असल्याचा आरोप केला आहे. रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, नेव्हिल रॉय सिंघमच्या नेटवर्कनं चुकीच्या माहितीला प्रोत्साहन दिलं आणि चीन समर्थक संदेशांचा प्रचार करून मुख्य प्रवाहातील काही प्रकरणांवर प्रभाव टाकला. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत ‘न्यूज क्लिक’वरील छापेमारीची माहिती दिली होती.