घाटकोपर पश्चिम येथील गोपाळ भवन येथील एका इमारतीत बंद असलेल्या घराचे टाळे तोडून घरातील दागदागिने असा एकूण साडे नऊ लाख रुपयांचा ऐवज चोरट्यानी पळवल्याची घटना शुक्रवारी भरदिवसा घडली.दिवसा ढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे घाटकोपर मधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलिसानी चार अनोळखी चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
घाटकोपर पश्चिम येथील एलबीएस मार्ग, गोपाळ भवन येथील इंद्रदीप सोसायटी या इमारतीत राहणारे मोहनलाल सेठिया (६२) हे राहण्यास आहे. त्याच इमारतीत त्यांची विवाहित मुलगी टिना जैन ही पती आणि मुलांसह राहते. मोहनलाल हे काही दिवसांपूर्वी राजस्थान येथे गावी गेले आहे. दरम्यान शुक्रवारी दुपारी टिना यांना वडिलांच्या शेजारी राहणाऱ्यानी फोन करून वडिलांच्या खोलीत प्लम्बिंगचे काम सुरू आहे का? अशी विचारणा केली असता वडील तर गावी गेले आहे असे सांगून टिना ही वडिलांच्या घरी खात्री करण्यासाठी जात असताना दोन अनोळखी इसम हातात काही हत्यार आणि बॅग घेऊन उतरत असताना टिनाला दिसले.
हे ही वाचा:
भारतीय अर्थव्यवस्था होणार इतक्या डॉलरची
महाराष्ट्र मच्छिमार संघाच्या संचालकपदी रामदास संध्ये यांची निवड
गूढ उकलले; बेपत्ता असलेल्या सदिच्छा सानेचा खून झाला!
ती वडिलांच्या घरी आली असता आणखी दोन इसम घराबाहेर पडत असताना ते प्लम्बर असल्याचे समजून तीने तुम्हाला घराची चावी कोणी दिली, अशी विचारणा केली असता दोघांनी काहीही उत्तर न देता तेथून पळ काढला.
टिनाला संशय येताच तिने घरात जाऊन बघितले असता घरातील कपाट उचकलले दिसून आले व कपाटातील सर्व सामान अस्ताव्यस्त अवस्थेत होते, त्याच बरोबर कपाटातील दागिने, रोकड इतर ऐवज मिळून न आल्यामुळे चोरी झाल्याचे तिच्या लक्षात येताच तिने पोलिसांना कळवले.
घाटकोपर पोलिसानी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करून घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार मोहनलाल सेठिया यांच्या घरातून चोरट्यानी सुमारे साडेनऊ लाख रुपयांचा ऐवज चोरी करून पोबारा केला आहे. सेठिया यांच्या घरी प्लम्बर म्हणून आलेले चार चोरट्यानी हे कृत्य केले असून सोसायटीतील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये चोरटे दिसून येत असून त्यांचा माग घेण्यात येत आहे.