हरियाणाच्या गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असताना एअर होस्टेसवर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आले होते. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप एका ४६ वर्षीय एअर होस्टेसने केला होता. यानंतर या प्रकरणात रुग्णालयात काम करणाऱ्या एका तंत्रज्ञाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या जवळपास एक आठवड्यानंतर १४ एप्रिल रोजी तक्रार दाखल करण्यात आली आणि सदर पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला. गुरुग्रामचे डीसीपी अर्पित जैन यांनी पुष्टी केली की तक्रारीनंतर लगेचच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले. “१४ एप्रिल रोजी आम्हाला एका खाजगी रुग्णालयात लैंगिक अत्याचाराची तक्रार मिळाली. प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवण्यात आला आणि या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले. मुझफ्फरपूरचा रहिवासी असलेला आरोपी दीपक याला अटक करण्यात आली आहे. तो गेल्या पाच महिन्यांपासून रुग्णालयात तंत्रज्ञ म्हणून काम करत होता,” असे डीसीपी जैन म्हणाले.
दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने अटक केलेल्या आरोपीलाही निलंबित केले आहे. “आम्हाला माहिती मिळाली आहे की पोलिसांनी एका संशयिताची ओळख पटवली आहे ज्याला रुग्णावर लैंगिक अत्याचाराच्या आरोपांबाबत सुरू असलेल्या चौकशीच्या संदर्भात ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी आम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे, सध्या आम्ही संशयित कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे,” असे रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे.
हे ही वाचा :
दक्षिण आफ्रिकेतून लवकरच नव्या चित्त्यांचे होणार आगमन!
गुजरातमध्ये ‘इंडी’ आघाडीत फूट; काँग्रेस पोटनिवडणुका स्वबळावर लढणार!
बांगलादेशात हिंदू नेत्याचे अपहरण करून निर्घृण हत्या
दिल्लीत इमारत कोसळून चार जणांचा मृत्यू
प्रकरण काय?
पश्चिम बंगालमधील एअर होस्टेस महिला एका वर्कशॉपसाठी म्हणून गुरूग्राममध्ये आली होती. हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये ही महिला बुडाली होती. यानंतर बचावलेली महिला आजारी पडली म्हणून तिला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर, ६ एप्रिल रोजी, तिची प्रकृती अधिक बिघडल्याने तिच्या पतीने तिला परिसरातील दुसऱ्या खाजगी रुग्णालयात हलवले, जिथे ही घटना घडली. ६ एप्रिल रोजी व्हेंटिलेटरवर असताना काही रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी लैंगिक अत्याचार केले, असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. प्रकृती ठीक नसल्यामुळे बोलण्याच्या किंवा त्या माणसांच्या हालचालींना विरोध करण्याच्या स्थितीत नसल्याचे त्या महिलेने म्हटले. तसेच खोलीत दोन परिचारिका होत्या, पण त्यांनी हस्तक्षेप केला नाही, अशी तक्रार महिलेने केली आहे. १३ एप्रिल रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर, एअर होस्टेसने तिच्या पतीला घटनेबद्दल सांगितले आणि पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.