सचिन वाझेचा साथीदार असणाऱ्या रियाज काझी याला २३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शुक्रवारी विशेष हॉलिडे कोर्टाने हा निर्णय दिला आहे. रियाज काझी हा एनआयएच्या अटकेत होता. त्याची अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन हत्या या दोन्ही प्रकरणात चौकशी सुरु होती.
अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओचे प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याचे नाव आल्यानंतर वाझेशी संबंधित अनेक लोकं राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या अर्थात एनआयएच्या रडारवर आले. त्यातलाच एक रियाज काझी. रियाज काझी हा सुद्धा एपीआय दर्जाचा पोलीस अधिकारी असून तो वाझेचा पोलीस दलातील साथीदार होता. या काझीचीही एनआयए मार्फत चौकशी झाली असून नंतर ११ एप्रिल रोजी काझीला अटक करण्यात आली. त्याच्यावर सचिन वाझे याला अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात मदत केल्याचं ठपका ठेवला गेला आहे. तसेच या प्रकरणांशी संबंधित पुरावे नष्ट करण्यातही काझीची भूमिका असल्याचे एनआयएचे म्हणणे आहे.
हे ही वाचा:
नॅशनल हाऊसिंग बँकेच्या बोर्डावर सतीश मराठेंची नियुक्ती
दिल्लीच्या नायाब राज्यपालांकडून हेल्पडेस्कची निर्मीती करण्याचे निर्देश
बीडमध्ये कोरोनाचा हाहाकार, सत्ताधारी मात्र गायब
एनआयएच्या ताब्यात असणाऱ्या काझीला शुक्रवार १६ एप्रिल रोजी विशेष हॉलिडे न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी काझीचा आणखीन ताबा आवश्यक नसल्याचे एनआयएकडून सांगण्यात आले. त्यानंतर आपला निकाल देताना न्यायालयाने काझीला २३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सध्या स्वतः सचिन वाझे हा न्यायालयीन कोठडीत असून, तळोजा येथील जेलमध्ये आहे. वाझेचे दोन सहकारी विनायक शिंदे आणि नरेश गौर हे देखील न्यायालयीन कोठडीतच आहेत. त्यात आता रियाज काझीचीही भर पडली आहे.