होर्डिंग कोसळल्याची दुर्घटना ‘देवाचे कृत्य’; भावेश भिंडेचा दावा फेटाळला

उच्च न्यायालयाचा दणका; मुक्काम तुरुंगातच

होर्डिंग कोसळल्याची दुर्घटना ‘देवाचे कृत्य’; भावेश भिंडेचा दावा फेटाळला

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडे याला उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. घाटकोपरमधील घटनेला आपण जबाबदार नसून ही घटना दैवी कृत्य आहे, असा दावा आरोपी भावेश भिंडे याने केला होता. तसेच आपली अटक बेकायदेशीर असल्याचेही म्हणणे त्याने मांडले. पण, उच्च न्यायालयाने भिंडे याची जामीनसाठीची याचिका फेटाळून लावली आहे.

मुंबईत अवकाळी पावसामुळे १३ मे रोजी घटकोपर येथे होर्डिंग पडल्याने १७ लोकांचा मृत्यू झाला होता. हे होर्डिंग भावेश भिंडे याच्या कंपनीने उभे केले होते. शिवाय ते अनधिकृत असल्याची बाब समोर आले होते. त्यामुळे सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली भिंडे याला अटक झाली. दरम्यान, भावेश भिंडे याने मुंबई उच्च न्यायलयात धाव घेत जामीनासाठी याचिका दाखल केली आहे. भिंडे याने आपली अटक बेकायदेशीर असून जामीनाची मागणी केली आहे. तसेच त्याच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची विनंतीही केली आहे. याशिवाय भावेश भिंडे याने अजब युक्तिवाद करत होर्डिंग कोसळल्याची दुर्घटना म्हणजे ‘देवाचे कृत्य’ (ॲक्ट ऑफ गॉड) असल्याचा युक्तिवाद भिंडे याने केला होता. ही नैसर्गिक आपत्ती होती आणि त्यासाठी आपल्याला जबाबदार धरू नये. ही याचिका न्यायमूर्ती भारती डंगरे आणि मंजुषा देशपांडे यांनी फेटाळून लावली. अटक प्रक्रियेत काही चुकीचे घडल्याचे दिसत नाही, अटकेची सर्व प्रक्रिया योग्यरीत्या पार पाडलेली आहे, असे न्यायमूर्तींनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

‘बांगलादेशात कट्टरवाद्यांमुळे स्मशानभूमीही शिल्लक नाहीत’

“सेलिब्रिटी असाल पण सदनाचे पावित्र्य राखावेच लागेल”

लालू यादव यांच्या निकटवर्तीय अमित कात्यालवर ईडीची कारवाई, ११३ कोटींची मालमत्ता जप्त!

कुत्रा अंगावर पडून चिमुकलीच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी कुत्र्याच्या मालकाला अटक

भिंडे याने १२ मे रोजी जारी केलेल्या भारतीय हवामान खात्याच्या बुलेटिनचा हवाला दिला आहे. ज्यात त्याने निदर्शनास आणून दिले आहे की, दुसऱ्या दिवशी (१३ मे) मुंबईत जोरदार वाऱ्यासह धुळीच्या वादळांचा अंदाज लावण्यात हवामान खात्याला अपयश आलं. परंतु, १३ मे रोजी दुपारी ४.१५ च्या सुमारास, मुंबईत धुळीचे वादळ आलं आणि ६० किमी प्रतितास ते ९६ किमी प्रति तास या वेगानं वाऱ्याचा तडाखा बसला, जे अत्यंत असामान्य होतं आणि यापूर्वी कधीही अनुभवलं नव्हतं. बीएमसीच्या स्वयंचलित हवामान केंद्रानं नोंदवल्यानुसार वाऱ्याचा वेग ताशी ९६ किमी होता आणि त्याचा परिणाम होर्डिंगवर झाला. वाऱ्याच्या वेगामुळेच होर्डिंग कोसळलं. हे होर्डिंग पडण्यास ‘देवाची कृती’ अर्थात ‘ॲक्ट ऑफ गॉड’ कारणीभूत होती आणि हा एक दुर्दैवी अपघात होता. त्यामुळे यासाठी याचिकाकर्ता (भिंडे) किंवा इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दोषी धरता येणार नाही, असा दावा करण्यात आला होता.

Exit mobile version