गोरेगावमध्ये हिट अँड रन; अल्पवयीन चालकाच्या गाडीच्या धडकेत २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

पोलिसांकडून १७ वर्षीय अल्पवयीन चालक, गाडीच्या मालकावर गुन्हा दाखल

गोरेगावमध्ये हिट अँड रन; अल्पवयीन चालकाच्या गाडीच्या धडकेत २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

पुणे आणि वरळीमधील हिट अँड रन प्रकरणे ताजी असतानाचा आता गोरेगाव येथेही असेचं एक प्रकरण घडल्याचे समोर आले आहे. गोरेगावमधील आरे कॉलनीत हिट अँड रनची धक्कादायक घटना घडली असून यात एका २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. तरुणाला धडक देणारा वाहन चालक हा अल्पवयीन होता आणि तो नशेत होता असा आरोप करण्यात येत आहे.

गुरूवार, २९ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एका अल्पवयीन चालकाच्या SUV गाडीने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या अपघातात नवीन वैष्णव (वय २४ वर्षे) या तरुणाचा मृत्यू झाला. यावेळी अल्पवयीन चालक हा नशेत होता, असा आरोप मृत तरूणाच्या नातेवाईकांनी केला आहे. नवीन हा पहाटे दुध पोहचवण्याचे काम करत होता त्यावेळी हा अपघात झाला.

दुचाकीला धडक दिल्यानंतर अल्पवयीन मुलगा चालवत असलेल्या वाहनाची धडक पुढे जाऊन विजेच्या खांबाला बसली. त्यामुळे वाहनात बसलेले चार जण किरकोळ जखमी झाले. अल्पवयीन चालक पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली. यानंतर अल्पवयीन चालकासह दोघे जण आणि वाहनाच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी या प्रकरणात १७ वर्षीय अल्पवयीन चालक, गाडीचा मालक इकबाल जीवानी (वय ४८ वर्षे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शिवाय घटनास्थळावरून सीसीटीव्ही चित्रण हाती घेत तपासाला सुरुवात केली आहे. अपघातग्रस्त गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे. शिवाय अल्पवयीन चालकाचे रक्ताचे नमुने घेण्यात आले असून ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

राजकोट किल्ला दुर्घटनेप्रकरणी चेतन पाटीलला कोल्हापुरातून अटक

मुख्यमंत्रीपदासाठी महायुतीत रस्सीखेच नाही!

सर्वसामान्यांना हक्काचे घर देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील

पुण्यात २२ वर्षी नौशाद चालवत होता बनावट टेलिफोन एक्स्चेंज

माहितीनुसार, गुरुवारी पहाटे नवीन वैष्णव हा घरोघरी दूध पोहचवण्यासाठी म्हणून बाहेर पडला होता. आरे कॉलनीतून जात असताना समोरून चुकीच्या दिशेने स्कॉर्पियो गाडी भरधाव वेगाने आली आणि दुचाकीला धडक दिली. या अपघातात नवीन वैष्णवचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत नवीनला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Exit mobile version