हिंगणघाट जळीतकांड : आरोपी विकेश नगराळेला जन्मठेप

हिंगणघाट जळीतकांड : आरोपी विकेश नगराळेला जन्मठेप

हिंगणघाट प्राध्‍यापिका जळीतकांड प्रकरणी हिंगणघाट जिल्‍हा आणि अतिरिक्‍त सत्र न्‍यायालयाने आज आरोपी विकेश नगराळे याला जन्‍मठेपेची शिक्षा सुनावली आहे. विकेश नगराळे याला न्‍यायालयाने बुधवारी दोषी ठरवले होते. नगराळे हा गेली दाेन वर्ष कारागृहात आहे. मात्र शिक्षा भाेगताना हा कालावधी गृहीत धरला जाणार नाही, असेही न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले आहे. दोन वर्षात २९ साक्ष घेऊन त्याला अखेर दोषी ठरवले आहे. अतिरिक्‍त जिल्‍हा सत्र न्‍यायालयाने आरोपी विकेश नगराळे याला पाच हजार रुपयांचा दंड व मरेपर्यंत जन्‍मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

हिंगणघाट येथे शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल टाकून विकेश नगराळे याने पीडित महिलेला पेटवून दिले होते. यामुळे ती शिक्षिका गंभीररित्या भाजली होती. सात दिवस तिने मृत्‍यूशी झूंज दिली होती आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर हिंगणघाट तसेच राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या या पीडित तरुणीला भरचौकात तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळण्यात आले. मोर्चे, आंदोलन करून घटनेचा निषेध नोंदविण्यात आला होता. शिक्षिकेवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या विकेश उर्फ विक्की नगराळे या नराधमाने हे घृणास्पद कृत्य केले होते.

हे ही वाचा:

WWE सुपरस्टार ग्रेट खली भाजपामध्ये

मुंबई विद्यापीठाच्या निर्णयावर मंगेशकर कुटुंबीय नाराज

बेरोजगारी, कर्जबाजारीमुळे तीन वर्षात २५ हजार आत्महत्या

सोनिया गांधींनी दीड वर्ष घराचे भाडेच भरले नाही

काय घडले होते?

पीडित महिला ३ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी घराबाहेर पडली होती. या तरुणीच्या मागावर एक तरुण आधीपासूनच होता. ही तरुणी नंदेरी चौकात पोहचल्यावर या युवकाने तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळले. ही धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील नंदेरी चौकात घडली होती. यामध्ये पीडित महिला ४० टक्के भाजली होती. तिच्यावर नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते; पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता.

Exit mobile version