शीव स्थानकात एका जोडप्याशी झालेल्या भांडणानंतर त्यांनी धक्का दिल्याने २६ वर्षीय दिनेश राठोड हा रुळांवर पडला होता. तो फलाटावर चढेपर्यंत रेल्वेने दिलेल्या धडकेत त्याचा मृत्यू झाला. मात्र ‘तेव्हा स्थानकावर उभे असलेल्या इतर प्रवाशांनी केवळ बघ्याची भूमिका का घेतली? बघ्यांपैकी कोणीही त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न का केला नाही?,’असा प्रश्न दिनेशचे नातेवाईक विचारत आहेत.
शीतल माने ही महिला प्रवासी १३ ऑगस्ट रोजी फलाट क्रमांक १ वर ट्रेनची वाट पाहात होती. त्यावेळी तिला दिनेशचा धक्का लागला. शीतलने त्याला छत्रीने मारहाण करण्यास सुरुवात केली. पती अविनाश माने यानेही त्याला मारल्यानंतर राठोड रुळावर पडला. तो फलाटावर पुन्हा चढण्याचा प्रयत्न करत असताना, त्याला लोकल ट्रेनने धडक दिली आणि सोमवारी पहाटे सार्वजनिक रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.
‘प्लॅटफॉर्मवरील सर्व प्रवासी या घटनेचे मूक साक्षीदार होते. घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून आले आहे की, काय होते आहे, हे बघण्यासाठी ते सर्वजण जमले होते. मात्र दिनेशला पकडण्याऐवजी आणि त्याला फलाटावर खेचण्याऐवजी त्यांनी फक्त पाहणेच पसंत केले,’ असे दिनेशचा चुलत भाऊ सुरेश राठोड याने सांगितले. सुरेशने काही नातेवाइकांसह शुक्रवारी दादर जीआरपी चौकीत येऊन दिनेशच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. “आम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की हे जोडपे दिनेशसोबत इतके हिंसक का होते? त्याला मारहाण करण्याऐवजी ते पोलिसांना बोलावू शकले असते,’ असे एका नातेवाइकाने सांगितले.
अविनाश आणि शीतल माने यांना १५ ऑगस्ट रोजी जीआरपीच्या गुन्हे शाखेने अटक केली असून सध्या ते दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. दिनेश बेस्टमध्ये बस कंडक्टर होता. तसेच, तो लहान भाऊ आणि बहिणीसोबत घणसोली येथे राहात होता. त्यांचे पालक वाशिम जिल्ह्यात राहतात. ‘बेस्टने त्याला नुकतेच कायमस्वरूपी कर्मचारी बनवले होते. त्याचे कुटुंब त्याच्यासाठी एक मुलगी शोधत होते आणि त्याने पुढच्या वर्षी लगीनगाठ बांधावी, अशी त्यांची इच्छा होती. त्याने एक गाडीही बुक केली होती,’ अशी माहिती आणखी एका नातेवाइकाने दिली.
हे ही वाचा:
फोन करत मुख्यमंत्र्यांना केला सॅल्युट; पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई
राज्यातील ७ हजार कैद्यांना पगारवाढ, ५ते ७ रुपयांनी करण्यात आली वाढ
उद्धव ठाकरे, अहंकाराच्या नशेत झिंगून देवेंद्र फडणवीसांवर टीका करतायत
अंतिम पंघलने पुन्हा जिंकले विश्वविजेतेपद; २० वर्षांखालील किताब सलग दुसऱ्यांदा पटकावला
दिनेशचे बहुतेक नातेवाईक मानखुर्द येथे राहतात. ‘दिनेशने आमच्यासोबत मानखुर्दमध्ये बराच वेळ घालवला. आमच्याकडे नुकतेच एक बाळ जन्मले आहे. दिनेशला बाळासोबत खेळायला खूप आवडायचे. १३ ऑगस्ट रोजी, कामावर जाण्यापूर्वी तो सकाळी बाळासह आम्हाला भेटायला आला होता. ही आमची शेवटची भेट ठरेल, अशी आम्ही कल्पनाही केली नव्हती,’ असे गणेश राठोड या चुलत भावाने सांगितले.
दिनेश हा माहीम-माटुंगा पट्ट्यातील बस डेपोशी संलग्न होता. १३ ऑगस्ट रोजी काम आटोपून घरी जाण्यासाठी ट्रेनमध्ये बसण्यासाठी रात्री नऊच्या सुमारास शीव स्थानकावर गेला होता. या दाम्पत्याशी झालेल्या भांडणाच्या तासाभरापूर्वी त्याचे भावाशी फोनवरून बोलणेही झाले होते. रात्री १०च्या सुमारास त्याच्या कुटुंबीयांना पोलिसांकडून फोन आला. ट्रेनने धडक दिल्याने तो जबर जखमी झाल्याचे पोलिसांनी त्यांना सांगितले होते. रेल्वेने त्याच्या आई-वडिलांना आणि भावंडांना आर्थिक नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्याचा विचार दिनेशचे नातेवाईक करत आहेत.