ठाण्यानंतर भाईंदरमध्ये फेरीवाले आले अंगावर धावून

ठाण्यानंतर भाईंदरमध्ये फेरीवाले आले अंगावर धावून

भाईंदर पूर्व परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकावर हल्ला झाल्याचे वृत्त ‘टीव्ही ९’ने दिले आहे. भाईंदर पूर्वमधील बी. पी. रोड परिसरात ही घटना घडली आहे. हल्लेखोर फेरीवाल्यांना महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी वेळीच रोखल्याने होणारा अनर्थ टळला. या प्रकरणी पाच फेरीवाल्यांवर नवघर पोलीस ठाण्यात कलम ३५३ अंतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाईंदर पूर्व परिसरातील बी.पी. रोडवर फेरीवाल्यांवर पालिकेकडून कारवाई सुरू होती. या कारवाई दरम्यान फेरीवाल्यांकडून पथकातील अधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आला. पालिकेच्या पथकातील अधिकारी प्रशांत पाटील यांना फेरीवाल्यांनी घेराव घालत धक्काबुक्की केल्याचे वृत्त आहे. सुमारे शंभरपेक्षा अधिक फेरीवाल्यांनी कारवाईसाठी गेलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना आणि पोलिसांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत फेरीवाल्यांना रोखल्याने अनर्थ टळला.

हे ही वाचा:

लोकसत्ताचे पत्रकार राजेंद्र येवलेकर यांची आत्महत्या

‘महाविकास आघाडी सरकारविरोधात रस्त्यावर उतरून एल्गार पुकारावाच लागेल’

ऐतिहासिक निर्णय! समलैंगिक सौरभ कृपाल न्यायाधीशपदी

मुंबई काँग्रेसमध्ये संघर्ष उफाळला; सिद्दीकींचे जगतापांविरोधात पत्र

या प्रकरणी पालिका अधिकारी प्रशांत पाटील यांनी तक्रार केली असून पाच जणांवर नवघर पोलीस ठाण्यात कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

काही महिन्यांपूर्वी, ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर देखील कारवाई दरम्यान एका फेरीवाल्याने हल्ला केला होता. या घटनेत त्यांना आणि त्यांच्या अंगरक्षकाला गंभीर दुखापत झाली होती.

Exit mobile version