भाईंदरमध्ये फेरीवाल्याकडून पालिका अधिकाऱ्यावर रॉडने हल्ला

भाईंदरमध्ये फेरीवाल्याकडून पालिका अधिकाऱ्यावर रॉडने हल्ला

मिरा- भाईंदरमध्ये फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिका अधिकाऱ्यावर एका फेरीवाल्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. फेरीवाल्याने कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्यावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याचे वृत्त ‘टीव्ही ९’ने दिले आहे. या हल्ल्यामध्ये अधिकाऱ्याला किरकोळ दुखापत झाली असून भाईंदर पश्चिम पोलीस ठाण्यात फेरीवाल्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाईंदर पश्चिमयेथील बॉम्बे मार्केटजवळ रस्त्यावर बसत असलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकातील अधिकाऱ्यावर एका फेरीवाल्याने हल्ला केला. फेरीवाल्याने लोखंडी रॉडने अधिकाऱ्यावर हल्ला केला असून या हल्ल्यात अधिकाऱ्याच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे.

भाईंदर पश्चिम येथील बॉम्बे मार्केट रस्त्यावर मोठ्या संख्येने फेरीवाले बसतात. त्यामुळे रविवारी संध्याकाळी पालिकेचे कर्मचारी कारवाईसाठी दाखल झाले. पथकाला पाहून उपस्थितीत फेरीवाले संतप्त झाले आणि त्यातीलच एका फेरीवाल्याने कारवाईचा विरोध करत फेरीवाले पथक अधिकारी राकेश त्रिभुवन यांच्या हातावर लोखंडी रॉडने वार केला.

हे ही वाचा:

महाराष्ट्राची डोकेदुखी वाढली! साऊथ आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

मथुरामध्ये जमावबंदी! कृष्ण जन्मभूमीवरील मशिदीचा वाद पुन्हा येणार ऐरणीवर?

दो साल, जनतेचे हाल

‘बाबासाहेब पुरंदरे हे इतिहासाचे एनसायक्लोपिडीयाच होते’

घटनास्थळी अधिकाऱ्यांच्या सुरक्षेकरीता सुरक्षा दलाचे कर्मचारी उपस्थितीत होते. तेव्हा सुरक्षा कर्मचारी आणि फेरीवाल्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. या संदर्भात अधिकारी राकेश त्रिभुवन यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुट पाटील यांनी दिली.

याच महिन्यात भाईंदर पूर्वच्या भागातही कारवाईसाठी गेलेल्या पालिका अधिकारी प्रशांत पाटील यांना फेरीवाल्यांनी घेराव घालत धक्काबुक्की केली होती. तसेच काही महिन्यांपूर्वी, ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर देखील कारवाई दरम्यान एका फेरीवाल्याने हल्ला केला होता. या घटनेत त्यांना आणि त्यांच्या अंगरक्षकाला गंभीर दुखापत झाली होती.

Exit mobile version