भाजप नेत्याच्या वाहनावर मुंबईत पेव्हरब्लॉकने हल्ला

भाजप नेत्याच्या वाहनावर मुंबईत पेव्हरब्लॉकने हल्ला

भाजप महाराष्ट्र वाहतूक संघटनेचे नेते हाजी अराफत शेख यांच्या वाहनावर पेव्हरब्लॉकने हल्ला करून भाजप सोडण्याची धमकी दिल्याची घटना मुंबईतील कुर्ला येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी कुर्ला पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाहनावर भलामोठा दगड टाकून त्याच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याला काही तास उलटत नाही तोच मुंबईतील भाजपचे महाराष्ट्र वाहतूक संघटनेचे नेते हाजी अराफत शेख यांच्या वाहनावर बुधवारी रात्री कुर्ला येथे त्याच्या राहत्या घराजवळ वाहनावर पेव्हरब्लॉक टाकून हल्ला करण्यात आला आहे. त्याच बरोबर एक चिठ्ठी टाकून त्यात त्यांना भाजप सोडण्यासाठी धमकी देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

कॅनडात पारा पन्नाशीच्या उंबरठ्यावर

सोनी, मोठकरीची एनआयएला करायची आहे अधिक चौकशी

वाहतुकीची कोंडी आणि नोकरीपेशा सर्वसामान्यही कोंडीत

शिंदे, पालांडे यांची कोठडी ६ जुलैपर्यंत वाढविली

हाजी अराफत शेख हे कुर्ला एलबीएस रोड या ठिकाणी राहण्यास आहेत. शेख हे पूर्वी भारतीय विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी होते. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून स्वतःचा मनसे पक्ष काढल्यानंतर शेख हे मनसेत आले. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या पदावर होते, तेथून त्यांनी राज ठाकरे यांची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता, त्यानंतर राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

बुधवारी मध्यरात्री ते राहत असलेल्या इमारतीत दोन अज्ञात इसमांनी प्रवेश करून हाजी शेख कुठे राहतात, असे सुरक्षा रक्षकाला विचारून आत प्रवेश केला. दरम्यान पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या शेख यांच्या वाहनांची पुढच्या काचेवर पेव्हर ब्लॉक फोडून त्यात त्यांनी धमकीची एक चिठ्ठी फेकून पोबारा केला.

या चिठ्ठीत  “तुझे आखरी चेतावनी दे रहा हू, बीजेपी छोड दे, लोगों को गुमराह करना बंद कर, अगली बार पत्थर नही कुछ और होगा. बीजेपी छोड….” असे लिहण्यात आले होते. गुरुवारी हाजी अराफत शेख यांनी कुर्ला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात इसमनाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेज वरून त्याचा कसून शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Exit mobile version