एसटी आंदोलकांचे नेतृत्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मुंबईतील गिरगाव न्यायालयाने सदावर्ते यांना आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सुनावणीदरम्यान वकील गुणरत्न सदावर्तेंनी स्वतः न्यायालयात बाजू मांडली.
एसटी कर्मचाऱ्यांकडून गुणरत्न सदावर्ते यांनी पैसे घेतले होते आणि त्या पैशातून मालमत्ता, गाडी खरेदी केली. याप्रकरणाच्या तपासाकरता पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिल प्रदीप घरत यांनी केली. तसेच सदावर्ते यांच्या घराच्या झडतीत महत्त्वाच्या गोष्टी सापडल्या आहेत. कागदपत्रे, रजिस्टर आणि नोटा मोजण्याची मशीन सापडली आहे. यावेळी विशेष सरकारी वकील प्रदिप घरत यांनी हर्षद मेहता प्रकरणाचा निकाल सदावर्ते प्रकरणात रेफरन्स म्हणून दिला.
त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी स्वत: युक्तीवाद करत आपली बाजू मांडली. गुणरत्न सदावर्ते म्हणाले, पोलीस हे दाखवण्याचा प्रयत्न करतायेत की हा एक मोठा स्कॅम आहे. मी ३०० ते ५०० रुपये घेतले पण ते फक्त न्यायालय कामकाजाकरता घेतले. एवढे कमी पैसे कोणता वकील घेतो हे सांगावे असाही सवाल सदावर्ते यांनी उपस्थित केला.
कागदपत्र जप्त केले ते वकालत नामा आहेत. माझ्या प्रकरणात हर्षद मेहता प्रकरणाचा दाखला दिला गेला हे दुःखद आहे. गाडी घेतल्याची नोंद आरटीओमध्ये आहे. गाडी घेण्याकरता पैसे दिले ते ॲानलाईन दिल्याचे पुरावे आहेत. २०१४ ची जुनी गाडी मी खरेदी केली आहे. नोटा मोजण्याची मशीन तीन हजाराला घेतली आहे, अशी माहिती गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे.
गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी कोर्टात आपला अर्ज दाखल करत सदावर्ते यांचा ताबा देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता सदावर्ते यांचा ताबा कोल्हापूर पोलिसांनी घेतला आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दोन समाजात तेढ निर्माण होईल, एकोप्याला बाधा येईल अशी कृती केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
हे ही वाचा:
जहांगीरपुरी हिंसाचारातील ३०० आरोपींची ओळख पटली
कुमार विश्वास यांच्या घरी पोहचले पोलीस; ट्विट करत मुख्यमंत्र्यांना दिला इशारा
भारताची भूमिका कौतुकास्पद; रशियाचे परराष्ट्र मंत्री लावरोव यांनी केले कौतुक
न्यायव्यवस्थेवर केलेली टीका संजय राऊतांना भोवणार
मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप पाटील यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती. मराठा आरक्षण विरोधी न्यायालयीन लढा लढण्यासाठी सदावर्ते यांनी बेकायदेशीरपणे पैसे जमवण्याचा तसेच उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेत अखेर कोल्हापुरात सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.
दरम्यान, सातारा सत्र न्यायालयाने गुणरत्न सदावर्ते यांना जामीन मंजूर केला आहे, यामुळे सदावर्ते यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. छत्रपती घराण्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी सातारा पोलिसांमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली होती.