प्रभाकर साईलला कोणत्या ऑफर आल्या ते तपासा!

प्रभाकर साईलला कोणत्या ऑफर आल्या ते तपासा!

किरण गोसावीने जारी केला व्हीडिओ

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात फरार असलेला एनसीबीचा साक्षीदार किरण गोसावी याला अटक करण्यात आली आहे. पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, किरण गोसावीला ताब्यात घेण्यात आले आहे. यातच किरण गोसावीनं एक व्हिडिओ जारी केलेला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून, ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित दुसरा पंच प्रभाकर साईलवर गोसावीने खळबळजनक आरोप केला आहे. त्याचे सर्व कॉल रेकॉर्ड तपासा अशी मागणी गोसावीने केली आहे.

गोसावी या व्हिडीओच्या माध्यमातून म्हणतो की, मुंबई पोलिसांनी जर प्रभाकर साईलचं प्रकरण हातात घेतलंच आहे तर त्यांनी सर्वात आधी प्रभाकरवरच कारवाई करावी. त्याचे आणि त्याच्या भावाचे फोन रेकॉर्ड तपासावेत. मंत्री वगैरे जेवढे याच्यामागे आहेत त्या सर्वांची माहिती काढावी”, असं किरण गोसावी यानं पोलिसांना आवाहन केलं आहे. या व्हिडीओतून किरण गोसावी याने आपल्यावरील आरोप पूर्णपणे फेटाळले आहेत. तसेच प्रभाकर साईल आणि त्याच्या दोन भावांची चौकशी करण्याची मागणी त्याने आता या व्हिडीओच्या माध्यमातून केलेली आहे.

प्रभाकर साईल जे काही सांगत आहे की “पैशांच्या देवण-घेवाणवरुन, सॅम डिसोझा सोबत संभाषण कुणाचं संभाषण झालं आहे. कोणी किती पैसे घेतले आहेत. प्रभाकर साईलला गेल्या पाच दिवसांत काय ऑफर आल्या आहेत हे त्याच्या मोबाइलवरुन समजेल. प्रभाकर साईल आणि त्याचे दोन्ही भाऊ यांचे सीडीआर रिपोर्ट आणि मोबाइल चॅट काढावेत. माझे सुद्धा त्याच्यासोबतचे चॅट काढावेत. माझा इम्पोर्ट-एक्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यामुळे पूर्वीचे काही चॅट्स असतील ज्यात पैशांच्या देवाण-घेवाण बाबत म्हटलं आहे. पण २ तारखेनंतरचे याचे चॅट्स तपासावेत. मुंबई पोलिसांनी याची चौकशी करावी, डिलिट केलेले चॅट काढावे. याच्या मागे कोण आहे याचीही चौकशी करावी. यांचे फोन रेकॉर्ड्स काढा सर्व गोष्टी समजतील. त्याने केलेले सर्व आरोप खोटे आहेत.” असे व्हिडीओच्या माध्यमातून गोसावीने म्हटले आहे.

किरण गोसावी हा गेल्या काही दिवसांपासून फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशपर्यंत जाऊन आले होते. मात्र तो हाती लागला नव्हता. किरण गोसावीने उत्तर प्रदेश पोलिसांकडे आत्मसमर्पण करण्याचा प्रयत्न केला होता. तिथे नकार मिळाल्यानंतर तो पुण्यात आला होता. तिथे तो पोलिसांकडे आत्मसमर्पण करणार असल्याची चर्चा होती. मात्र रात्री पुणे पोलिसांना त्याला ताब्यात घेतले.

गोसावी यांच्यावर फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल असून त्यापैकी एका प्रकरणात पोलीस त्याचा शोध घेत होते. पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोसावीला रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे.

 

हे ही वाचा:

आजारी सचिन वाझे चांदीवाल आयोगापुढे गैरहजर

भाजपा पुढील अनेक दशकं कुठेही जात नाही

अमरिंदर सिंग-अमित शहा भेटीत युतीची चर्चा?

घोटाळे लपविण्यासाठी उद्धव ठाकरे, शरद पवारांची ही ‘ट्रिक’

 

किरण गोसावी याच्याविरुद्ध पुण्यातील फरासखाना पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०१८ च्या या प्रकरणात त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीसही जारी करण्यात आली होती. तो अनेक दिवस फरार होता. किरण गोसावीला पकडण्यासाठी पुणे पोलिसांची दोन पथके उत्तर प्रदेशातही गेली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१८ मध्ये किरण गोसावी आणि शेरबानो कुरेशी यांनी पुण्यातील चिन्मय देशमुख नावाच्या तरुणाला मलेशियामध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणांची तीन लाख रुपयांची फसवणूक केली होती. याप्रकरणी पुणे पोलिसांनी शेरबानो कुरेशीला मुंबईतून अटक केली असून आता गोसावीलाही ताब्यात घेण्यात आले आहे. गोसावी ही तीच व्यक्ती आहे जी आर्यन खानसोबत सेल्फी घेऊन प्रसिद्धीच्या झोतात आली होती. गोसावी हा आर्यन प्रकरणात एनसीबीचाही साक्षीदार आहे.

Exit mobile version