सोने तस्करी प्रकरण: रान्या रावचा जामीन तिसऱ्यांदा फेटाळला

सोने खरेदीसाठी हवालाद्वारे पाठवलेल्या पैशांचा वापर केल्याची दिली होती कबुली

सोने तस्करी प्रकरण: रान्या रावचा जामीन तिसऱ्यांदा फेटाळला

सोने तस्करी प्रकरणात सहभागी असलेली कन्नड अभिनेत्री रान्या राव हिचा जामीन अर्ज बेंगळुरूमधील सत्र न्यायालयाने फेटाळला. रान्या हिचा जामीन फेटाळण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वीही तिचा जामीन अर्ज दोनदा फेटाळण्यात आला होता. वरिष्ठ आयपीएस अधिकारी रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी रान्या राव हिला ३ मार्च रोजी बेंगळुरू विमानतळावर १४.२ किलो सोन्याची तस्करी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. जप्त केलेल्या सोन्याची किंमत १२.५६ कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे. नंतर, तिच्या निवासस्थानाची झडती घेतली असता अधिकाऱ्यांनी २.०६ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि २.६७ कोटी रुपयांचे भारतीय चलन जप्त केले होते.

सोन्याच्या तस्करीच्या प्रकरणात बेंगळुरूमधील ६४ व्या सीसीएच सत्र न्यायालयाने रान्या रावचा जामीन अर्ज फेटाळला. न्यायालयाने गुरुवारी या प्रकरणात आदेश जारी केला. दरम्यान, रान्या रावला तस्करीचे सोने विकण्यास मदत करणारा सोने विक्रेता साहिल जैन याला २९ मार्चपर्यंत डीआरआय कोठडीत पाठवण्यात आले आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांना सोने घेऊन जाताना आढळल्यानंतर ३ मार्च रोजी बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर रान्या रावला अटक करण्यात आली होती. नंतर डीआरआयचे अतिरिक्त संचालक अभिषेक चंद्र गुप्ता यांच्या तक्रारीवरून केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने एफआयआर दाखल केला. १९८८ च्या भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत, भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या अनेक कलमांसह एफआयआर दाखल करण्यात आला.

हे ही वाचा:

हुर्रियत कॉन्फरन्सशी संबंधित आणखी दोन गटांनी फुटीरतावादाचा केला त्याग

राष्ट्राध्यक्ष पुतीन लवकरच येणार भारत दौऱ्यावर

अर्थसंकल्पिय अधिवेशन निरर्थक, अपयश लपवणारे!

बलुचिस्तानमधील संघर्ष, परराष्ट्र धोरणावरून इम्रान खान यांनी पाक सरकारला सुनावले

रान्या राव हिने सोने खरेदीसाठी हवालाद्वारे पाठवलेल्या पैशांचा वापर केल्याची कबुली दिली आहे. डीआरआयने दावा केला आहे की, रान्या राव आणि तिचा मित्र तरुण राजू यांनी दुबईला २६ वेळा प्रवास केल्याचे पुराव्यातून समोर आले आहे. तरुण हा रान्याचा मित्र असून सोन्याच्या तस्करी प्रकरणात आरोपी आहे. रान्याने तरुणच्या खात्यात पैसे पाठवले आणि त्याचे तिकीट बुक केले, जो नंतर दुबईहून हैदराबादला गेला, असे अधिकाऱ्यांनी उघड केले होते. तपास यंत्रणांना संशय आहे की, एकाच दिवसात सुरू असलेल्या या प्रवासाचा वापर भारतात सोन्याची तस्करी करण्यासाठी केला जात होता. २०२३ ते २०२५ दरम्यान रान्या रावच्या ५२ दुबईच्या सहलींबद्दल आणखी एक संशयास्पद माहिती होती. या सर्व फेऱ्यांपैकी ४५ फेऱ्या या एक दिवसीय होत्या. जानेवारी २०२५ मध्ये रान्या हिने २७ वेळा दुबईला भेट दिली. यासाठी ती बंगळूरू, गोवा आणि मुंबईमधून प्रवास करत होती.

महायुतीतील कोणता नेता वक्फ बोर्डावर प्रसन्न ? | Dinesh Kanji | Waqf board | Mahayuti Sarkar |

Exit mobile version