उल्हासनगर येथील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला. परंतु घटना घडून गुन्हा दाखल होऊन महिना उलटला, तरीही आरोपी मोकाटच असल्यामुळे अत्याचारग्रस्त मुलीसह तिच्या कुटुंबानं पोलीस ठाण्यासमोरच आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी पीडित मुलीसह तिच्या आई-वडिलांना आत्मदहन करण्यापासून परावृत्त करत ताब्यात घेतलं आहे. मात्र पीडित मुलगी आणि तिच्या आई-वडिलांनी अंगावर रॉकेल ओतून घेताच पोलिसांनी या तिघांनाही आत्मदहन करण्यापासून परावृत्त करत ताब्यात घेतलं आणि पुढील अनर्थ टळला. या तिघांनाही सध्या उल्हासनगर पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आलं आहे. त्यांचं समुपदेशन करण्यात येणार असल्याची, तसंच मुलीवरील अत्याचाराच्या गुन्ह्याची त्यांना माहिती देण्यात येणार असल्याची माहिती उल्हासनगर परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली आहे.
उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर ऑगस्ट महिन्यात लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानुसार आरोपी रोशन माखीजा आणि पंकज त्रिलोकानी या दोघांच्या विरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र त्यानंतरही या दोघांना अटक करण्यात आली नाही. याबाबत मुलीच्या वडिलांनी वारंवार पोलीस अधिकार्यांकडे दाद मागितली. तरीही न्याय न मिळाल्यामुळे आज अखेर पीडित मुलीसह तिच्या आई-वडिलांनी उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या बाहेर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
हे ही वाचा:
… म्हणून त्यांनी चोरल्या सव्वादहा लाखांच्या बाईक!
मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा असा होणार लिलाव
बापरे! महाराष्ट्रातील २३ हजार महिला गायब
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
दुसरीकडे या प्रकरणातील आरोपी पंकज त्रिलोकानी आणि रोशन माखीजा हे दोघे राजकीय संघटनांशी संबंधित आहेत. त्यामुळेच पोलिसांकडून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी केला होता. त्यामुळे आता उल्हासनगर पोलीस या दोघांवर कारवाई करतील का? हे मात्र पाहावं लागणार आहे.