मुंबईतील चर्नीरोड स्थानकात एका सोनसाखळी चोराने तरुणीवर ब्लेडने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पश्चिम रेल्वेच्या चर्नीरोड रेल्वे स्थानकावर शुक्रवार ११ मार्च रोजी मध्यरात्री हा प्रकार घडला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. मात्र, या घटनेनंतर रेल्वेमधील महिला सुरक्षा मुद्दा पुन्हा प्रकाशझोतात आला आहे.
संबंधित तरूणी पश्चिम रेल्वेवरील वांद्रे स्थानकातून रात्री ११.४५ वाजता लोकल ट्रेनमध्ये चढली होती. ही ट्रेन चर्चगेटच्या दिशेने जात होती. ट्रेन चर्नीरोड स्थानकात आल्यावर स्टेशनवर उभ्या असलेल्या एका चोराने महिलांच्या डब्यात प्रवेश केला. या चोराने तरुणीच्या गळ्यातील चेन खेचण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तरूणीने चोराला विरोध केला. या झटापटीत चोराने तरूणीवर ब्लेडने हल्ला केला. या हल्ल्यात संबंधित तरूणी गंभीर जखमी झाली आहे.
या घटनेनंतर लोहमार्ग पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. परंतु, हा हल्ला झाला तेव्हा महिला डब्यातील पोलीस कुठे होते? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी रात्रीच्या वेळी महिलांच्या प्रत्येक डब्यात एक पोलीस कर्मचारी तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या निर्णयाचे काय झाले? असा सवाल आता विचारला जात आहे.
हे ही वाचा:
देवेंद्र फडणवीसांची चौकशी सुरु
वात्सल्यमूर्ती ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख कालवश
बॉक्स ऑफिसवर ‘द काश्मीर फाइल्स’ची कोटींची कमाई!
इराणने इराकमधील अमेरिकेच्या दूतावासावर डागले क्षेपणास्त्र
दरम्यान, आरोपी महिलांच्या डब्यात प्रवेश करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय कठोर कारवाई होणार याकडे लक्ष लागून आहे.