मुंबईत एका मुलीचे फुटपाथवरून अपहरण, दोन महिला अटकेत

मुंबईत एका मुलीचे फुटपाथवरून अपहरण, दोन महिला अटकेत

‘सीएसएमटी’ येथील सेंट झेव्हीयर्स शाळेच्या बाहेरील फुटपाथवरून एका अडीच महिन्यांच्या मुलीला आईच्या कुशीतून उचलून नेल्याची घटना ताजी असतानाचं मुलं चोरण्याची दुसरी घटना मुंबईतून समोर आली आहे.

सांताक्रूझ पश्चिम येथील एसएनडिटी महाविद्यालयाजवळील फुटपाथवर राहणाऱ्या एका कुटुंबातील एक वर्षाच्या मुलीचे सोमवर, ३१ ऑक्टोबर रोजी पहाटे अपहरण करण्यात आले होते. याप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तात्काळ मुलीच्या शोधासाठी तपास पथकं तयार केले होते. त्यानुसार मुंबई गुन्हे शाखा कक्ष ९ च्या पथकाने या गुन्ह्याचा संलग्न तपास करून दोन अपहरणकर्त्या महिलांना सोलापूर रेल्वे स्थानकातून अटक केली. तसेच या महिलांच्या तावडीतून एक वर्षाच्या मुलीची सुटका करून मुंबईत आणले.

यापूर्वी सेंट झेव्हीयर्स शाळेच्या बाहेरील फुटपाथवर राहणाऱ्या एका कुटुंबातील अडीच महिन्यांच्या चिमुरडीला तिच्या आईच्या कुशीतून उचलून नेण्यात आले होते. ऐन दिवाळीच्या सणात घडलेल्या मुलं चोरी प्रकरणात आझाद मैदान पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबई पोलिसांनी मूल चोरीचे प्रकरण गंभीरपणे घेऊन २४ तासांच्या आत अंटोप हिल परिसरातून एका दाम्पत्याला अटक करून त्यांच्या तावडीतून मुलीची सुटका करण्यात आली होती.

हे ही वाचा:

राज्यातील बँकिंग घोटाळ्यांची होणार चौकशी

भारताने बांगलादेशला नमवले आणि पाकिस्तानची केली कोंडी

नाशिकमध्ये देशातील पहिली खासगी बाजार समिती

घरी बसून महाराष्ट्र पिंजून काढतायत उद्धव ठाकरे….

या दोन्ही घटनांमधील दोन्ही वेगवेगळ्या टोळ्या असून, आझाद मैदान पोलिसांनी अटक केलेली टोळी ही मुलं होत नसलेल्या दाम्पत्याना चोरीचे मुलं विकत होती. तर सोलापूर येथून गुन्हे शाखेने अटक केलेली टोळी ही भीक मागण्यासाठी लहान मुलांची चोरी करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र, मुंबई पोलिसांनी या दोन्ही गुन्ह्याचा छडा लावून दोन्ही मुलींची सुखरूप सुटका केली आहे. याप्रकरणी पोलिसानी मुले चोरणाऱ्या दोन टोळ्यांना अटक केली आहे.

Exit mobile version