मुंबईतील घाटकोपरमध्ये अवकाळी पावसाच्या दरम्यान मे महिन्यात एक होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. १३ मे रोजी घडलेल्या या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला होता तर अनेक लोक जखमी झाले. याप्रकरणी मुख्य आरोपी भावेश भिंडे याला पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. दरम्यान, भावेश भिंडे याने मुंबई उच्च न्यायलयात धाव घेत जामीनासाठी याचिका दाखल केली आहे. भिंडे याने आपली अटक बेकायदेशीर असून जामीनाची मागणी केली आहे. तसेच त्याच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची विनंतीही केली आहे.
याशिवाय भावेश भिंडे याने अजब युक्तिवाद केला आहे. होर्डिंग कोसळल्याची दुर्घटना म्हणजे ‘देवाचे कृत्य’ (ॲक्ट ऑफ गॉड) असल्याचा युक्तिवाद भिंडे याने केला आहे. ही नैसर्गिक आपत्ती होती आणि त्यासाठी आपल्याला जबाबदार धरू नये. यासोबतच त्याने दावे सिद्ध करण्यासाठी याचिकेत ब्युफोर्ट स्केलचाही उल्लेख करण्यात केला आहे. यातून वाऱ्याचा वेग मोजला जातो.
भिंडे याने १२ मे रोजी जारी केलेल्या भारतीय हवामान खात्याच्या बुलेटिनचा हवाला दिला आहे. ज्यात त्याने निदर्शनास आणून दिले आहे की, दुसऱ्या दिवशी (१३ मे) मुंबईत जोरदार वाऱ्यासह धुळीच्या वादळांचा अंदाज लावण्यात हवामान खात्याला अपयश आलं. परंतु, १३ मे रोजी दुपारी ४.१५ च्या सुमारास, मुंबईत धुळीचे वादळ आलं आणि ६० किमी प्रतितास ते ९६ किमी प्रति तास या वेगानं वाऱ्याचा तडाखा बसला, जे अत्यंत असामान्य होतं आणि यापूर्वी कधीही अनुभवलं नव्हतं. बीएमसीच्या स्वयंचलित हवामान केंद्रानं नोंदवल्यानुसार वाऱ्याचा वेग ताशी ९६ किमी होता आणि त्याचा परिणाम होर्डिंगवर झाला. वाऱ्याच्या वेगामुळेच होर्डिंग कोसळलं. हे होर्डिंग पडण्यास ‘देवाची कृती’ अर्थात ‘ॲक्ट ऑफ गॉड’ कारणीभूत होती आणि हा एक दुर्दैवी अपघात होता. त्यामुळे यासाठी याचिकाकर्ता (भिंडे) किंवा इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दोषी धरता येणार नाही, असा दावा करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
दुबईच्या राजकुमारीने इंस्टाग्रामवर पतीस दिला ‘तीन तलाक’ !
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट शेअर केल्यास होणार फौजदारी कारवाई होणार
हरियाणात अग्निवीरांसाठी १० टक्के आरक्षण, बिनव्याजी कर्जही मिळणार !
अरविंद केजरीवालांच्या याचिकेवरील निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने ठेवला राखून
प्रकरण काय?
घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून जीवितहानी झाली होती. हे होर्डिंग इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे होते आणि भावेश भिंडे हा कंपनीचा संचालक आहे. यामुळे त्याला दुर्घटनेस जबाबदार ठरवून पोलिसांनी अटक केली होती. मात्र, आता भावेश त्याने अटकविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.