अंबरनाथ एमआयडीसीत वायूगळती; श्वसनाच्या त्रासामुळे ३० जण रुग्णालयात

अंबरनाथ एमआयडीसीत वायूगळती; श्वसनाच्या त्रासामुळे ३० जण रुग्णालयात

अंबरनाथ येथील आनंद नगर एमआयडीसीतील आर के केमिकल या कंपनीत रासायनिक वायूगळती होऊन नागरिकांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. त्रास होत असलेल्या ३० व्यक्तींना उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आज (१२ ऑक्टोबर) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अंबरनाथ एमआयडीसी प्लॉट क्रमांक एन/१०/१ येथील आर के केमिकल कंपनीमध्ये ही दुर्घटना घडली असून येथून सल्फ्युरिक ऍसिड या केमिकलची गळती झाली. या कंपनीमध्ये मंगळवारी रासायनिक प्रक्रियेचे काम सुरू असताना पाईपलाइन खराब झाली आणि हा वायू वातावरणात पसरला. गळतीनंतर आजूबाजूच्या परीसरातील लोकांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. या कंपनीच्या बाजूला असलेल्या प्रेस फिट या कंपनीमधील कर्मचाऱ्यांना केमिकलच्या त्रासामुळे उलटी, मळमळ, श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले.

हे ही वाचा:

पाकिस्तानी दहशतवाद्याला केली दिल्लीत अटक

‘उद्धवजी, किमान राज्यातील जनतेची दिवाळी तरी गोड करा’

वाहतूक नियम मोडणाऱ्यांना लावणार जबरदस्त ‘ब्रेक’

एनसीबी संचालक वानखेडे यांच्या मागावर गुप्तहेर

संबंधित घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पोलीस आणि अंबरनाथ एमआयडीसी अग्निशमन दलाचे फायर वाहन घटनास्थळी दाखल झाले. सदर घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून सदर ठिकाणी सल्फ्युरिक ऍसिड या केमिकलची गळती थांबवण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती अंबरनाथ अग्निशमन केंद्रातून देण्यात आली आहे.

Exit mobile version