मुंबई विमानतळावर जप्त केला पाच कोटींचा गांजा

सीमाशुल्क विभागाची कारवाई

मुंबई विमानतळावर जप्त केला पाच कोटींचा गांजा

मुंबई विमानतळावर अमलीपदार्थ विरोधी कारवाई करण्यात आली आहे. फूड पाकिटे आणि धान्यांच्या पाकिटातून अमलीपदार्थांची तस्करी करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सीमाशुल्क विभागाने ही कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत पाच कोटी रुपये आहे.

मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी बँकॉक येथून आलेल्या तीन प्रवाशांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या फूड पाकिटामधून गांजा हा अंमली पदार्थ सापडून आला आहे. जप्त करण्यात आलेला गांजाची किंमत पाच कोटी असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या प्रकरणी युसूफ नूर, अब्दुल सबित आणि समीर यांना अटक करण्यात आली आहे.

युसूफ हा नवी दिल्ली येथे राहणारा असून साबीत आणि समीर हे केरळ राज्यातील रहिवाशी आहेत. सीमाशुल्क विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युसूफ नूर शनिवारी बँकॉकहून मुंबई विमानतळावर आला होता. त्याच्या ट्रॉली बॅगची झडती घेतली असता, त्या बॅगेमध्ये कॉर्न फ्लेक्स, रोस्टेड कॉर्न, केक आणि नॉन-डेअरी क्रीम अशा विविध खाद्यपदार्थांची १० पाकिटे असल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले. अधिकाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी ही पाकिटे कापली असता त्यात ४.८९० किलोग्रॅम अमलीपदार्थ असलेली २० पाकिटे सापडली. हा अंमली पदार्थ गांजा असल्याचे समोर आले.

जप्त करण्यात आलेल्या गांजा या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाच कोटी एवढी किंमत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. सीमाशुल्क विभागाने नूरकडे केलेल्या चौकशीत त्याने अधिकाऱ्यांना माहिती दिली की, विमानतळाबाहेर एक व्यक्ती या वस्तू घेण्यासाठी येत आहे. त्यानंतर सीमाशुल्क अधिकाऱ्यांच्या एका पथकाने विमानतळाबाहेर सापळा लावला आणि नूरकडून अमलीपदार्थांची पाकिटे घेण्यासाठी आलेल्या समीर आणि अब्दुल सबित यांना ताब्यात घेतले. पुढे सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी नेले.

हे ही वाचा..

जीपीएस बिघडल्याने दिशा चुकली, अन जीवाला मुकले !

‘बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो सुरक्षित रहेंगे’

राहुल गांधींच्या जन्माष्टमी ट्विटमधून श्रीकृष्णच गायब!

‘महिला सुरक्षेबद्दल बोलणारे उद्धव माझ्यासाठी काय करणार?’

सीमाशुल्क विभागाने ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांच्या मोबाईल फोनची तपासणी केली असता आणि त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत हे दोघे अंमली पदार्थ तस्करीच्या रॅकेटमध्ये सामील असल्याचे समोर आले आहे. युसूफ नूरने सीमाशुल्क अधिकाऱ्यांना सांगितले की, तो एका महिलेच्या निर्देशानुसार बँकॉकला गेला होता, तिने त्याच्या परतीच्या प्रवासाची तिकिटे बुक केली होती आणि हॉटेलचे बुकिंग केले होते आणि आर्थिक फायद्यासाठी बँकॉकमधून भारतात काही वस्तूंची तस्करी करण्याचे निर्देश दिले होते. अंमली पदार्थांची यशस्वी डिलिव्हरी केल्याबद्दल नूरला १५ हजार रुपये दिले जाणार होते, अशी माहिती समोर आली आहे.

Exit mobile version