आपल्या गुंडगिरीच्या जोरावर उत्तरप्रदेशमध्ये आपले साम्राज्य उभारणारा गँगस्टर आणि राजकारणी मुख्तार अन्सारी याचा उत्तरप्रदेश मधील बांदा वैद्यकीय रुग्णालयात मृत्यू झाला. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे.
बांदा तुरुंगात अन्सारीला हृदय विकाराचा झटका आल्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. पण तिथे त्याचा मृत्यू झाला.
छातीत दुखू लागल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. त्यावेळी रुग्णालयाबाहेर प्रचंड बंदोबस्त लावण्यात आला होता.
गेल्या आठवड्यात न्यायालयासमोर सुनावणीत त्याने म्हटले होते की त्याच्यावर तुरुंगात विषप्रयोग करण्यात येत आहे. शिवाय तुरुंगात कोणत्याही सुविधा नाहीत अशी तक्रारही त्याने न्यायालयात केली होती.
हे ही वाचा:
शिवसेनेची यादी जाहीर; शेवाळे, बारणे, मंडलिक यांना उमेदवारी
मुंबई इंडियन्सला सचिन तेंडुलकरचा गुरुमंत्र
संजय राऊत अकोल्यातून ‘वंचित’च्या विरोधात देणार होते उमेदवार
दरम्यान, अन्सारीचे नातेवाईक रुग्णालयात पोहोचले आहेत. त्याचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्यांनतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
अन्सारीचा जन्म १९६३ मध्ये उत्तर प्रदेशातील युसुफपूर येथे झाला होता. तो पाचवेळा आमदार होता आणि मऊ मतदारसंघातून तो निवडून येत असे.
त्याच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेशात विविध ठिकाणी अलर्ट जारी करण्यात आला आहे।