पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. याबाबत स्वतः चन्नी यांनी मोरिंडामधील एक सभेत सांगितले. गँगस्टर गोल्डी बराडच्या टोळीने त्यांच्याकडून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. चन्नी याला एका विदेशी फोन क्रमांकावरून व्हॉट्सऍप कॉल करण्यात आला होता. खंडणी मागणाऱ्याने तो गँगस्टर गोल्डी बराडचा माणूस असल्याचे म्हटले आहे. तसेच, खंडणीची रक्कम न दिल्यास त्यांना पंजाबचा गायक सिद्धू मुसेवाला याच्याप्रमाणे त्यांचीही हत्या करण्याची धमकी दिली आहे.
या प्रकरणी पंजाबचे पोलिस महासंचालक गौरव यादव यांच्याकडे तक्रार दाखल केल्याचे चन्नी यांनी सांगितले. ज्या व्हॉट्सऍप नंबरवरून त्यांना फोन कॉल आणि मेसेज आले, ते नंबरही पोलिसांना देण्यात आला आहे. त्यांना वेगवेगळ्या व्हॉट्सऍप कॉलवरून धमक्यांचे संदेश दिले जात असल्याचेही चन्नी यांनी सांगितले. एक-दोन दिवसांत खंडणीची रक्कम न दिल्यास जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार करून एक आठवडा उलटून गेला तरी याबाबत कोणतीही कारवाई झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
परकीय चलन हस्तांतरण व्यावसायिकाची २५ हजार डॉलरना फसवणूक
यशस्वी जैस्वाल म्हणतो, स्वप्नांचा पाठलाग करा,यश नक्की मिळेल!
१२ हजारांचा फायदा झाला म्हणून पैसे गुंतवले आणि फसला…
कर्नाटकात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या; फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट
या प्रकरणाची चौकशी करून आरोपीवर कारवाई करण्याची मागणी चन्नी यांनी केली आहे. राज्यात जर माजी मुख्यमंत्रीच सुरक्षित नसेल तर तिथे सामान्य जनतेची काय व्यथा, असा प्रश्नही चन्नी यांनी उपस्थित केला आहे.
पंजाबमध्ये गँगस्टर उघडपणे उद्योगपती, मंत्री, कलाकार आणि लोकांना खंडणीसाठी धमकवत आहेत. मात्र पोलिस हे रोखू शकलेले नाही. सगळीकडे लुटारू आणि गँगस्टरचा हैदोस आहे. मात्र पंजाब सरकार डोळे मिटून आहे, असा आरोपही त्यांनी केला.