देशभरात मुलं विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, ८ महिलांसह ९ जणांना अटक

आईने विकले आपल्या बाळाला

देशभरात मुलं विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, ८ महिलांसह ९ जणांना अटक

माटुंगा पोलिसांनी मुलं विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेट उध्वस्त केले आहे, या प्रकरणी मुंबई, गुजरात आणि कर्नाटकातून ९ जणांना अटक केली असून एका ४ महिन्याच्या मुलीची कर्नाटकातुन सुटका करण्यात आली आहे.

या रॅकेटमध्ये कर्नाटकातील एका डॉक्टर आणि नर्सचे नाव समोर येत असून लवकरच डॉक्टर आणि नर्सला अटक होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. सुटका करण्यात आलेल्या ४ महिन्याच्या मुलीला ५ लाख रुपयांत कर्नाटकातील कारवार येथे एका दाम्पत्याला विकले होते, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिली आहे.

सुलोचना सुरेश कांबळे (४५),मिरा राजाराम यादव (४०),योगेश भोईर (३७),रोशनी घोष (३४),संध्या राजपूत (४८), मदिना उर्फ मुन्नी इमाम चव्हाण (४४), तैनाज शाहिन चौहान (१९),बेबी मोईनुद्दीन तांबोळी (५०) आणि मनिषा सनी यादव (३२) असे अटक करण्यात आलेल्या ९ जणांचे नावे असून मनीषा यादव ही विक्री करण्यात आलेल्या ४ महिन्याच्या मुलीची आई आहे.

दादर, दिवा, शिवडी कल्याण, वडोदरा, कारवार आणि मिरज या ठिकाणी राहणारे आरोपी हे लग्न जमवणे, रुग्ण सेवा, आणि रुग्णालयात आया म्हणून कामे करतात. या गुन्ह्यातील तक्रारदार विक्री केलेल्या मुलीची आजी असून ती सायन-माहिम लिंकरोड, येथे राहण्यास आहे. ११ डिसेंबर रोजी तीने माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली की, तिच्या सुनेने तिच्या ४ महिन्याच्या मुलीला बेंगलोर येथे विकले आहे.

या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल करून आई मनीषा यादवला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने तिचे मूल वडोदरा येथे राहणाऱ्या मदिना उर्फ मुन्नी आणि तैनाज यांच्या मदतीने कर्नाटक येथे विकल्याची कबुली दिली, बदल्यात तिला १ लाख रुपये मिळाले असल्याची माहिती तीने पोलिसांना दिली.

परिमंडळ ४ च्या पोलीस उपायुक्त रागासुधा आर. यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ ४ मधील माटुंगा आणि इतर पोलीस ठाण्याचे एक पथक या गुन्ह्याच्या तपासकामी तयार करण्यात आले. या पथकाने वडोदरा, तसेच ठाणे, मुंबई, दिवा कल्याण आणि कर्नाटक येथून एका पुरुषासोबत ८ महिलाना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता हे मूल त्यांनी कारवार येथे एका दाम्पत्याना ५ लाख रुपयांना विकले असल्याची माहिती मिळाली. त्यातील १ लाख रुपये मुलीच्या आईला देण्यात आले तर, तर इतर महिलांना प्रत्येकी १० ते १५ हजार मिळाले.

हे ही वाचा:

१९९१चा प्लेसेस ऑफ वर्शिप कायदा म्हणजे न्यायाच्या मार्गात ठोकलेली पाचर…

कुर्ला ‘बेस्ट’अपघातातील जखमीपैकी आणखी एकाचा मृत्यू!

पक्षाची परिस्थिती २०१४ पेक्षा दारुण कोसळण्याच्या वाटेवर काँग्रेस; उतरवणार ठाकरेंचे ओझे…

दाऊदच्या दानिश चिकनाला ड्रग्स प्रकरणात डोंगरीतून अटक!

या मुलं विक्री रॅकेटमध्ये कारवार येथील एका स्त्री रोग तज्ञ डॉक्टर आणि नर्सचा सहभाग असल्याची माहिती अटक केलेल्या आरोपीना दिली आहे. कारवार येथून विक्री करण्यात आलेले ४ महिन्याचे मूूूल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, या टोळीने जवळपास पाच ते सहा मुलाची विक्री केली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीना भोईवाडा न्यायालयात हजर करण्यात आले असून १९ डिसेंबर पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणी पुढील तपास सुरू असून डॉक्टर आणि नर्स सह आणखी काही जणांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Exit mobile version