विमानाने प्रवास करून देशातील विविध भागात दरोडे घालणारी सराईत टोळी पोलिसांनी जेरबंद केली असून त्यांना हैदराबाद येथून ताब्यात घेण्यात आले.
पवई येथे राहणाऱ्या एका कुटुंबाचे ५० लाखांचे दागिने आणि विदेशी चलन असा मुद्देमाल घेऊन ही टोळी हैदराबादला पळाली होती. १० सप्टेंबरला हिरानंदानी पवई येथील रहिवासी निरंजन खरडेनवीस हे पत्नीसह मेघालयला फिरण्यासाठी गेले होते. त्याचदरम्यान, या आरोपींनी त्यांच्या घराचे कडीकोयंडे तोडून कपाटातून ६२७ ग्रॅम वजनाचे दागिने चोरले तसेच २४ लाख ७१७०० रुपयांचे विदेशी चलनही लांबविले.
पवई पोलिसांकडे घरकाम करणाऱ्या महिलेने तक्रार नोंदविल्यावर पोलिसांनी तपासाला प्रारंभ केला. त्यात सीसीटीव्हीत रात्री एका गाडीतून तीन संशयित इसम दरोड्याच्या उद्देशाने आल्याचे दिसले. तौसिफ कुरेशी, पाशा गौस, मोहम्मद सलीम हबीब कुरेशी उर्फ मुन्ना अशी त्यांची नावे आहेत. ते हैदराबाद येथे असल्याचे कळल्यावर पोलिसांनी हैदराबाद गाठले.
आपली चोरी पकडली जाऊ नये म्हणून विविध राज्यात फिरत राहणाऱ्या या टोळीला १० दिवस निगराणी ठेवत अखेर जेरबंद केले. त्यातील मुख्य आरोपी मात्र बेंगळुरू येथे होता. तिथेही पोलिस पथक पोहोचले आणि त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून २१ लाख ६० हजारांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
या आरोपींना ९ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या टोळीतील मुख्य आरोपी मुन्ना याच्यावर घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. एकूण २१५ गुन्हे हैदराबाद, तेलंगणा, जयपूर, नाशिक, मुंबई, सूरत अशा शहरात त्याच्यावर दाखल आहेत. त्यांच्याकडून ९० टक्के मालमत्ता पोलिसांनी हस्तगत केली आहे.
हे ही वाचा:
चीनी गारठले; कमांडरच्या मृत्युमुळे पूर्व लडाखमधील भयंकर थंडीची झाली जाणीव!
वसुली म्हटली की ‘ससा’ आणि शेतकऱ्यांना मदत म्हटल्यावर ‘कासव’…असे हे ठाकरे सरकार!
शाळा सुरू झाली; पण विद्यार्थी येईनात!
रतन टाटांनी केले मोदी सरकारच्या धोरणांचे कौतुक
अपर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, सहा. पोलिस उपायुक्त महेश्वर रेड्डी, सहा. पोलिस आयुक्त मुकुंद पवार, वरिष्ठ पो. निरीक्षक आबुराव सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकृष्ण हारुगडे, निरीक्षक विनोद पाटील, पो. उपनिरीक्षक विनोद लाड, यश पालवे, हवालदार मोहोळ, अडांगळे, येडगे, जाधव, देशमुख, लाड, पिसाळ, चौगुले यांनी ही कामगिरी करून दाखविली.