बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणीचा आरोप असलेल्या वाल्मिक कराड याला तुरुंगात मारहाण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना तुरुंगात मारहाण झाल्याचे वृत्त माध्यमांनी दिले असून जेल प्रशासनाने याला अद्याप दुजोरा दिलेला नाही. वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर मकोका कायद्यातंर्गत कारवाई केली जात आहे. त्यांना अटक केल्यानंतर बीडच्या कारागृहात ठेवण्यात आले आहे.
वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले या दोघांना महादेव गीते आणि अक्षय आठवले या दोन आरोपींनी मारहाण केल्याची माहिती आहे. मकोका कायद्याअंतर्गत आरोपी असलेला वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले हे दोघे सध्या बीडच्या कारागृहात कैद आहेत. तसेच संतोष देशमुख हत्याकांडातील इतर आरोपीही त्याच तुरूंगात आहेत. तर बाजूच्या, बॅरेकमध्ये अक्षय आठवले नावाचा आरोपी असून तोही मकोका कायद्याअंतर्गत शिक्षा भोगत आहे. महादेव गीते हा परळीतील आणखी एक आरोपी असून गीते आणि अक्षय आठवले हे दोघे वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर धावून गेल्याची माहिती समोर आली आहे.
महादेव गीते हा बापूराव आंधळे खून प्रकरणातील आरोपी आहे, वाल्मिक कराडने आपल्याला या हत्या प्रकरणात अडकवलं, असा त्याचा आरोप होता. तर, आठवले टोळीवर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मकोका दाखल झाला होता. वाल्मिक कराडने आपल्याला खोट्या गुन्ह्यामध्ये फसवलं आणि पुन्हा वाचवल्याचा बनाव केला, अशी पोस्ट सनी आठवलेने केली होती. त्यानंतर सनी आठवले आणि त्याच्या टोळीवर मकोका दाखल झाला होता. सनी शामराव आठवले याच्यासह त्याचा भाऊ अक्षय शामराव आठवले, आशिष आठवले, मनीष क्षीरसागर, प्रसाद धीवार व ओंकार सवाई या सहा जणांवर मकोका दाखल झाला होता. सनी आठवलेचा भाऊ अक्षय आठवले यानेच वाल्मिक कराडला मारहाण केली.
हे ही वाचा..
दहशतवादी हाफिज सईदच्या जवळच्या सहकाऱ्याची कराचीत गोळ्या घालून हत्या
मोदींकडे भारतासाठीचा हजार वर्षांचा दृष्टीकोन!
नमाजावेळी काळी पट्टी बंधणाऱ्यावर काय म्हणाले हुसेन ?
पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी कसा होता मार्च?
आठवले टोळीने आतापर्यंत खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, अवैध शस्त्र, अवैधरीत्या शस्त्रांची विक्री, दरोडा, मारामारी, पोलिसांच्या तावडीतून जीवघेणा हल्ला करून पळून जाणे, सरकारी कामात अडथळा, खंडणी मागणे यांसारखे १९ गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याची नोंद आहे. दरम्यान, तुरुंगात आठवले टोळी आणि कराड टोळीमध्ये मागच्या काही दिवसांपासून धूसफूस सुरु असल्याची माहिती आहे. वाल्मिक कराडने खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवल्याचा राग आठवले टोळीमध्ये असून त्यामुळेच त्यांनी आणि महादेव गीतेने वाल्मिक कराडचा बदला घेतला, असं बोललं जात आहे.