गडचिरोली पोलिसांकडून नक्षल उपकमांडर चैनुराम कोरसाला अटक

महाराष्ट्र सरकारकडून १६ लाख रुपयांचे बक्षीस होते जाहीर

गडचिरोली पोलिसांकडून नक्षल उपकमांडर चैनुराम कोरसाला अटक

जहाल नक्षल उपकमांडरच्या मुसक्या आवळण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. चैनुराम उर्फ सुक्कू वत्ते कोरसा (वय ४८; रा. टेकामेट्टा, जि. नारायणपूर, छत्तीसगड) असे अटक करण्यात आलेल्या नक्षल उपकमांडरचे नाव आहे. कोरसा याचा अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभाग होता. शिवाय महाराष्ट्र सरकारने त्याच्यावर १६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

माहितीनुसार, शनिवार, १४ ऑक्टोबर रोजी नक्षल उपकमांडर कोरसा हा गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील कांकेर (छत्तीसगड) सीमेलगत असलेल्या जारावंडी आणि पेंढरी या दोन्ही पोलीस ठाण्यात घातपात करण्याच्या उद्देशाने रेकी करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे जारावंडी पोलीस ठाणे हद्दीतील जारावंडी ते सोहगाव जाणाऱ्या रोडवरील कूरमावडा फाट्याजवळ विशेष अभियान पथकाच्या जवानांनी नक्षलविरोधी अभियान राबवत कोरसा याला अटक केली. २०२३ मध्ये हिक्केर जंगल परिसरात झालेल्या पोलिस माओवादी चकमकीसंदर्भात त्याच्यावर एटापल्ली येथे दाखल गुन्ह्यावरून अटक करण्यात आलेली आहे.

हे ही वाचा:

भारत पाक सामन्यात स्विगी, झोमॅटोकडून भारताला अनोख्या शुभेच्छा

इस्रायलने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये हमासच्या एरियल फोर्सचा प्रमुख ठार

मणिपूर विद्यार्थी हत्याकांड प्रकरणातील मास्टरमाइंडला पुण्यातून अटक

इस्रायलकडून गाझामध्ये छापे; ‘ही तर केवळ सुरुवात’ नेतान्याहू यांचा इशारा

महाराष्ट्र सरकारने चैनुराम कोरसा याच्यावर १६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. गडचिरोली पोलीस दलाच्या कारवाईमुळे जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकुण ७१ माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान)अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अहेरीचे अपर पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनात पार पडली.

Exit mobile version