बांगलादेशी खासदार अन्वारुल अझीम अनार यांची हत्या बांगलादेशी-अमेरिकी नागरिक अख्तरझ्झमन उर्फ शाहीन याने केल्याचे उघड झाले आहे. पश्चिम बंगाल पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अनार आणि अख्तरझ्झमन हे कोलकाता येथून सोन्याच्या तस्करीत सामील होते. अनार हे वैद्यकीय उपचारासाठी शहरात आल्यानंतर १३ मे रोजी पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे मृतावस्थेत आढळून आले. हे प्रकरण हनीट्रॅपचे असल्याचाही संशय आहे. कारण सदर खासदार हे महिलेसोबत एका खोलीत गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते आहे.
या हत्येचा त्यांच्या सोन्याच्या तस्करीच्या कारवायांशी संबंध असावा असे मानले जात असले तरी, भारतीय तपास यंत्रणांनी किंवा बांगलादेशी एजन्सींनी या कथित संबंधाची पुष्टी केलेली नाही. अनार आणि अख्तरझ्झमन यांच्यात व्यावसायिक मुद्द्यांवरून वाद झाले आणि अख्तरझ्झमानने अझीमला मारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याने अमानुल्ला नावाच्या व्यक्तीला हत्येसाठी नियुक्त केले आणि त्यानंतर मुस्तफिझूर आणि फैसल नावाच्या आणखी दोघांना या कटात सामील केले.
पोलिसांनी सांगितले की, अमानुल्ला हा पुर्बो बांग्लालर कम्युनिस्ट पक्षाचा माजी नेता आहे आणि तो दोन हत्येच्या गुन्ह्यांमध्ये २० वर्षे तुरुंगात होता. अख्तरझ्झमानने जिहाद आणि सयाम नावाच्या आणखी दोघांनाही या कटात सामील करून घेतले आणि हे दोघेही पासपोर्टशिवाय बांगलादेशातून भारतात पोहोचले. त्यांच्या कटाचा एक भाग म्हणून हत्येपूर्वी अख्तरझ्झमानने या सर्वांच्या राहण्यासाठी कोलकाता येथे एक अपार्टमेंट भाड्याने घेतले होते. अख्तरझ्झमान कोलकाता येथे भाड्याने राहण्यासाठी दरमहा एक लाख रुपये देत होता. ३० एप्रिल रोजी अख्तरझ्झमान अमानुल्लासोबत कोलकाता येथे गेला.
हत्येनंतर आरोपींनी मृतदेहाचे तुकडे करून ते सुटकेसमध्ये भरले. त्यांनी सुटकेस त्यांच्या एका भारतीय मित्राला त्याची विल्हेवाट करण्यासाठी दिली. आत्तापर्यंत या प्रकरणी अमानुल्ला आणि त्याचे दोन सहकारी मुस्तफिजूर आणि फैसल यांना अटक करण्यात आली आहे. चौकशीत त्यांनी हत्येची कबुली दिली आहे.
अमानुल्लाने बांगलादेशातील पोलिसांना सांगितले की, त्याला हत्येसाठी पाच कोटी टाकाची (साडे तीन कोटी रुपये) सुपारी देण्यात आली होती. १५ मे रोजी अमानुल्ला ढाका येथे परतला आणि त्याचे साथीदार लवकरच परतले. वृत्तानुसार, अमानुल्लाला हत्येसाठी पाच कोटी टाके मिळतील असे वचन दिले होते. बांगलादेशातील पोलिसांनी मंगळवारी रात्री अमानुल्लाला अटक केली असून, त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे फैसल आणि मुस्ताफिजूरला अटक करण्यात आली आहे.
बांगलादेशातील कोटचंदपूर नगरपालिकेचे महापौर असलेले अख्तरझ्झमन यांचे भाऊ शाहिदझ्झमान यांनी सांगितले की, अख्तरझझमान यांनी रमझमदरम्यान बांगलादेशला भेट दिली होती. त्याचा भाऊ आणि अन्वारुल अझीम अनार यांचे चांगले संबंध असल्याचेही त्यांनी सांगितले. ढाका मेट्रोपॉलिटन पोलिसांचे अतिरिक्त आयुक्त हारुण ओर रशीद म्हणाले, “आम्ही भारतीय पोलिसांसोबत काम करत आहोत. आम्हाला बरीच माहिती मिळाली आहे जी आम्ही आता तपासासाठी सांगू शकत नाही.”
हे ही वाचा:
‘३७० जागांचा दावा हा अंदाजपंचे आकडा नाही’
छत्तीसगडमध्ये ८ नक्षलवाद्यांना टिपले, चकमक सुरू!
‘अरविंद केजरीवाल हे ‘अनुभवी’ चोर’
‘जो काँग्रेसच्या पावलावर चालेल, तो रसातळाला जाईल’
अख्तरझ्झमान अमेरिकन पासपोर्टवर भारतात आला!
गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, हत्येचा मुख्य सूत्रधार अख्तरझ्झमान नेपाळला पळून गेला असून तो सध्या काठमांडूमध्ये लपला आहे. त्याने कोलकाता ते दिल्ली असा प्रवास केला आणि तेथून तो नेपाळला पळून गेला. डेली स्टारने अनार यांच्या मित्रांपैकी एक गोपाल बिस्वास यांचा हवाला देत सांगितले की, पोलिसांना या हत्येमागे अख्तरझ्झमनचा हात असल्याचा संशय आहे. अख्तरझ्झमन हे एका प्रभावशाली कुटुंबातील आहेत. अख्तरझ्झमानने अमेरिकन पासपोर्ट वापरून कोलकात्यात प्रवेश केला आणि हत्येनंतर पळून गेलेल्या सात बांगलादेशींच्या मदतीने ही हत्या घडवून आणली, असा दावा गोपालने केला. त्याच्याकडे अमेरिका आणि बांगलादेशचे दुहेरी नागरिकत्व आहे.
हत्येत महिलेचा सहभाग
तपासादरम्यान तपासकर्त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना खासदार अन्वारुल अझीम अनार यांच्यासोबत दोन पुरुष आणि एक महिला घरात घुसल्याचे आढळले. नंतर खासदार वगळता तिघेही भाड्याचे घर सोडून निघून गेले. कोलकाता पोलिसांनी सांगितले की, मृतदेह टाकण्यात टॅक्सी चालकाचाही सहभाग होता आणि त्याला पोलिसांनी पकडले.