एका खाजगी कंपनीने गुंतवणूकदारांना मोठ्या परताव्याचे आमीष दाखवत लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कंपनीनं दिलेल्या आश्वासनानुसार हप्ते मिळत नसल्याची तक्रार गुंतवणूकदारांनी केली आहे. कंपनीच्या योजनेत अनेकांनी लाखो रुपये गुंतवल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला कंपनीकडून काही हप्ते देण्यात आले पण गेल्या दोन आठवड्यांपासून कंपनीकडून काहीच माहिती दिली जात नसल्याचं गुंतवणूकदारांचं म्हणणं आहे.
गुंतवणूकदारांना मोठं आमिष दाखवत गुंतवणूक करा आणि व्याजासह मोठ्या रकमेचा फायदा मिळवा असे आवाहन एका चिटफंड कंपनीने केले होते. टोरेस लिमिटेड असं या कंपनीचं नाव होतं. त्यांनी गुंतवणूकदारांना पाच वर्षात दुप्पट, सात वर्षात तीनपट आणि १० वर्षामध्ये चौपट रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते. शिवाय दर महिन्याला विशिष्ट व्याजही गुंतवणुकदारांच्या खात्यात जमा होईल असंही सागंण्यात आलं. या योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून सुमारे तीन लाख लोकांनी यात गुंतवणूक केली. यानंतर आता या कंपनीला टाळे लागले असून दादर येथील मुख्यालयासह नवी मुंबई, मिरा भाईंदर येथेही टोरेस कंपनीच्या कार्यालयाबाहेर गुंतवणूकदारांनी गर्दी केली आहे.
हे ही वाचा :
ताज हॉटेल बाहेर एकाच क्रमांकाच्या दोन गाड्या, तपासणीत धक्कादायक माहिती उघड!
पंतप्रधान मोदींचे परदेश दौरे विकासासाठी, तर उद्धव ठाकरेंची टीका ‘विनोदासाठी’
नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाचे वाहन आयईडी स्फोटाने उडवले
केजरीवालांच्या शीशमहालावर ८ नव्हे ३३ कोटींचा खर्च, २९ लाखांचा फक्त टीव्ही!
सध्या कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोलिसांचा बंदोबस्त असून कोणतीच माहिती दिली जात नसल्याचं गुंतवणूकदारांचं म्हणणं आहे. नवी मुंबईच्या कार्यालयावर काही संतप्त गुंतवणूकदरांनी दगडफेक केल्याचाही प्रकार समोर आला आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत गुंतवणूकदारांना हप्ते मिळत असल्याची माहिती आहे पण गेल्या दोन आठवड्यांपासून हप्ते मिळत नसल्याचं गुंतवणूकदारांचं म्हणणं आहे. कंपनीमध्ये नागरिकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.