ज्येष्ठ अभिनेते अनु कपूर यांची फसवणूक

हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अनु कपूर हे सायबर गुन्हेगाराचे सावज झाले.

ज्येष्ठ अभिनेते अनु कपूर यांची फसवणूक

हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अनु कपूर हे सायबर गुन्हेगाराचे सावज झाले, सायबर गुन्हेगाराकडून केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली अनु कपूर यांचे संपूर्ण बँक खातेच रिकामे करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. पोलिसांनी मात्र वेळीच पावले उचलून अनु कपूर यांच्या खात्यातून दुसऱ्या खात्यावर वळते झालेल्या रकमेपैकी ३ लाख ८ हजार रुपये रोखण्यास पोलिसांना यश आले असले तरी अनु कपूर यांना १ लाख २८ हजार रुपयांचा फटका बसला आहे.

हिंदी चित्रपट अभिनेते अनु कपूर हे मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतात. गुरुवारी अनु कपूर यांना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून कॉल आला होता. कॉल करणाऱ्या व्यक्तीने एचएसबीसी बँकेच्या प्रमुख शाखेमधून कृष्णकुमार रेड्डी बोलत असल्याचे सांगून केवायसी अपडेट करण्यासंदर्भात अनु कपूर यांना सांगण्यात आले. केवायसी अपडेट नसेल तर बँक खाते बंद होईल असे कपूर यांना सांगण्यात आले. फोन करणाऱ्याने अनु कपूर यांचा विश्वास संपादन करून मोबाईलवरून तुमचे केवायसी अपडेट करून देतो असे सांगून मोबाईलवर येणारा ओटीपी तेवढा पाठवा असे सांगितले.

अनु कपूर यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून ओटीपी दिला, काही वेळाने केवायसी अपडेट झाल्याचे कपूर यांना सांगण्यात आले. काही वेळाने कपूर यांना बँकेच्या ग्राहक सेवा कक्ष येथून कॉल आला व तुम्ही बँक खाते बंद करत आहात का असे विचारले. तुम्ही तुमच्या खात्यातील ४ लाख ३६ हजार दुसऱ्या खात्यावर वळते करण्यात आले आहे असे अनु कपूर यांना कळविण्यात आल्यानंतर त्यांना धक्काच बसला. आपली फसवणूक झाल्याचे कळताच अनु कपूर यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

हे ही वाचा:

आणि पंतप्रधान मोदींनी चालवली गाडी

काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खरगेंचे पारडे जड

“5G नेटवर्कमुळे भारतातील टेलिकॉम क्षेत्रात मोठे बदल घडणार”

कांदिवलीत झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू

ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तात्काळ बँकेच्या व्यवस्थापक यांना संपर्क साधून कुठल्या खात्यावर ही रक्कम वळती झाली याची माहिती आणि बँकेची माहिती काढली. कॅनरा आणि युनियन बँकेत दोन खात्यावर ही रक्कम वळती झाल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी कॅनरा बँक आणि युनियन बँकेशी संपर्क करून ज्या खात्यावर ही रक्कम वळती झाली ते खाते गोठविण्याची विनंती केली.

बँकेने तात्काळ हे दोन्ही खाते गोठवले मात्र एका खातेधारकाने १ लाख २८ हजार ही रक्कम काढून घेतली होती. उर्वरित ३ लाख ८ हजार रुपये अनु कपूर यांच्या खात्यावर वळविण्यात आले.

Exit mobile version