डिजिटल अरेस्टप्रकरणी चार जणांच्या मुसक्या आवळल्या; ७.६७ कोटींची झालेली फसवणूक

सीबीआयची १२ ठिकाणी छापेमारी

डिजिटल अरेस्टप्रकरणी चार जणांच्या मुसक्या आवळल्या; ७.६७ कोटींची झालेली फसवणूक

केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) डिजिटल अरेस्ट प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. या टोळीतील चार जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या सायबर गुन्हेगारांमध्ये दोघे मुंबईचे आणि दोघे मुरादाबादचे आहेत. दरम्यान, डिजिटल अरेस्ट टोळीविरुद्ध सीबीआयने १२ ठिकाणी छापे टाकले.

सीबीआयकडून डिजिटल अटक सारख्या गुन्ह्यांचे जाळे पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी ‘ऑपरेशन चक्र-V’ राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. सीबीआयकडून १२ वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली. या शोध मोहिमेनंतर सीबीआयने चार जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी मुंबई आणि मुरादाबाद येथील असल्याची माहिती समोर आली आहे.

अलिकडच्या काही महिन्यांत डिजिटल अटक संबंधित अनेक तक्रारी सीबीआयकडे प्राप्त झाल्या आहेत. या संदर्भात, राजस्थान सरकारच्या विनंतीवरून सीबीआयने झुंझुनू सायबर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेला गुन्हा आपल्या ताब्यात घेतला होता. या प्रकरणात एका व्यक्तीला पोलीस आणि इतर सरकारी एजन्सीच्या नावाने तीन महिने डिजिटल अरेस्टमध्ये ठेवण्यात आले होते. या कालावधीत ४२ वेळा त्यांची एकूण ७.६७ कोटी रुपयांची फसवणूक झाली. सीबीआयने तांत्रिक विश्लेषण आणि डेटा प्रोफाइलिंगचा वापर करून या प्रकरणाचा सखोल तपास केला.

तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे उत्तर प्रदेशातील मुरादाबाद आणि संभल, मुंबई, जयपूर आणि पश्चिम बंगालमधील कृष्णनगर येथे शोधमोहीम राबवण्यात आली. यावेळी बँकेचे तपशील, चेक बुक, डेबिट कार्ड, डिपॉझिट स्लिप आणि डिजिटल उपकरणांसह अनेक महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हे ही वाचा : 

मुर्शिदाबादेत मारल्या गेलेल्या दास यांच्या कुटुंबावर केला होता ५०० जणांनी हल्ला!

“वक्फ मालमत्ता तृणमूल नेत्यांच्या, म्हणूनच बंगालमध्ये हिंसाचार”

मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी १२५ वर्षे जुन्या कराराचा वापर; काय आहे करार?

अयोध्येत राम मंदिराचे काम ९९ टक्के पूर्ण

डिजिटल अरेस्ट हा एक सायबर फ्रॉडचा नवा प्रकार असून यात चोरटे पोलीस, ईडी, कस्टम, सीबीआय, इन्कम टॅक्स अधिकारी असल्याची बतावणी करत संबंधित व्यक्तीला कॉल करतात. त्यानंतर त्यांच्यावर किंवा त्यांच्या कुटुंबियांवर अनैतिक कामात सामील असल्याचा आरोप करतात. पुढे साधा कॉल किंवा व्हिडीओ कॉल करून अटक करण्याची भीती दाखवतात. खोटी कागदपत्रेही सादर केली जातात. अटकेची भीती घालून कारवाई टाळण्यासाठी दंड भरण्याचा दबाव टाकून लूट केली जाते.

अमित शहांच्या स्नेहभोजनात मटण जे शिजलंच नाही ! | Mahesh Vichare | Amit Shah | Sunil Tatkare |

Exit mobile version