पुण्यातील प्रसिद्ध अशा ‘चितळे बंधू मिठाईवाले’ यांना बदनामीची धमकी देत वीस लाखांची खंडणी मागणाऱ्या एका टोळीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. चितळे यांच्या विरोधात खोटी तक्रार करून त्यांना बदनामीची धमकी दिली जात होती. तर हे प्रकार थांबवण्यासाठी वीस लाखाची खंडणी मागण्यात आली होती. याप्रसंगी पुणे पोलिसांनी कारवाई करत या खंडणीखोर टोळीला रंगेहात अटक केली आहे.
या प्रकरणात पुनम सुनील परदेशी (वय २७), सुनील बेनी परदेशी (वय ४९), करण सुनील परदेशी (वय २२) आणि अक्षय मनोज कार्तिक अशा चौघांना अटक करण्यात आली आहे. यापैकी पुनम परदेशी ही एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका असून सुनील आणि करण परदेशी यांचा लॉन्ड्रीचा व्यवसाय असल्याची माहिती मिळत आहे.
हे ही वाचा:
भाजपा आंदोलन करायला आजही घाबरली नाही आणि उद्याही नाही !
मनसुखच्या डायटम रिपोर्टमुळे नवा संशय
फडणवीसांच्या घरी ओबीसी नेत्यांची खलबतं
व्हेल माशाची ‘उलटी’ विकणारे तिघे जाळ्यात
पुनम परदेशी यांनी ग्राहक तक्रार निवारण केंद्रात चितळे यांच्या दुधाविषयी तक्रार नोंदवली होती. चितळे यांच्या दुधामध्ये काळ्या रंगाच्या सदृश्य पदार्थ आढळून आला असे या तक्रारीत म्हटले गेले होते. याबद्दल चितळे यांना फोन करूनही सांगण्यात आले आणि धमकी देण्यात आली. हे प्रकरण लवकरात लवकर मिटवा अन्यथा तुमचे दुकान चालू देणार नाही, ते बंद पाडू, तुमची बदनामी करू, कोणालाही जिवंत सोडणार नाही, अशा धमक्या चितळे यांना देण्यात आल्या. तर हे प्रकरण मिटवण्यासाठी वीस लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आली.
याप्रकरणी चितळे उद्योग समूहातील सहाय्यक मार्केटिंग व्यवस्थापक नामदेव पवार यांनी पुण्यातील बिबवेवाडी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत या खंडणी मागणाऱ्या टोळीला अटक केली आहे. दोन हजार रुपयांच्या बनावट नोटांची दहा बंडले चितळे यांच्यामार्फत या खंडणी मागणाऱ्या टोळक्याला देण्यात आली. ही खंडणी स्विकारतानाच पोलिसांनी त्यांना रंगेहात अटक केली आहे.