मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत चार महिला नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. विशेष म्हणजे या महिला नक्षलवाद्यांवर एकूण ६२ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. मध्य प्रदेशासह, देशातील इतर नक्षलग्रस्त भागात एक मोहीम राबविली जात आहे, ज्यामध्ये आतापर्यंत हजारो नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे आणि शेकडो नक्षलवादी चकमकीत मारले गेले आहेत.
कान्हा राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या बालाघाट जिल्ह्यातील सुपखार वनक्षेत्रात सुरक्षा दलाकडून मोहीम राबवण्यात आली होती. गुप्तचर माहितीच्या आधारे विशेष सुरक्षा पथकाने जंगलांच्या कठीण भौगोलिक परिस्थितीत ही कारवाई केली. चकमकीदरम्यान झालेल्या भीषण गोळीबारात चारही महिला नक्षलवादी ठार झाल्या. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा आणि नक्षलवादी साहित्य जप्त करण्यात आले आहे.
घटनेची माहिती देताना बालाघाटचे एसपी नागेंद्र कुमार सिंह म्हणाले की, कान्हा राष्ट्रीय उद्यानाच्या सुपखार वनक्षेत्रात झालेल्या चकमकीत सैनिकांनी चार महिला नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. त्यांनी सांगितले की, या महिला नक्षलवाद्यांवर एकूण ६२ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. मध्य प्रदेशात नक्षलवाद्यांवर सतत कारवाई केली जात असल्याचे एसपी म्हणाले. अलिकडच्या काळात, मध्यप्रदेशात नक्षलवाद्यांविरुद्धची मोहीम तीव्र झाली आहे आणि नक्षलवाद्यांविरुद्धची ही मोहीम आता सातत्याने सुरू राहील. शिवाय त्यांनी सांगितले की, जो कोणी नक्षलवादी कारवायांमध्ये सहभागी आहे आणि आत्मसमर्पण करू इच्छितो त्याने सरकारला पाठिंबा द्यावा. शरण येणाऱ्यांना कोणतेही नुकसान होणार नाही.
हे ही वाचा :
गुजरातमधून ५५० हून अधिक बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांना घेतलं ताब्यात
पुलवामा, शोपियान, कुलगाममध्ये दहशतवाद्यांची घरे स्फोटकांनी उडवली
पाकिस्तानची मग्रुरी सुरूचं; नियंत्रण रेषेवर विविध ठिकाणी गोळीबार
पहलगामचा कट पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिजला?
झारखंड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये सातत्याने नक्षलवाद्यांविरुद्ध सतत मोहिमा राबवल्या जात आहेत. या कारवायांमध्ये अनेक नक्षलवादी मारले गेले आहेत तर अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पणही केले आहे. अलिकडेच छत्तीसगड- तेलंगणा सीमेवर नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत ५ नक्षलवादी मारले गेले. सुरक्षा दलाने येथे १ हजाराहून अधिक नक्षलवाद्यांना घेरले होते. ७२ तासांहून अधिक काळ चाललेल्या या कारवाईत अनेक नक्षलवादी मारले गेले.