मणिपूरमध्ये एक विद्यार्थी आणि विद्यार्थिनीच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एन. बिरेनसिंह यांनी रविवारी याबाबत माहिती दिली. या हत्येच्या निषेधार्थ गेल्याच आठवड्यात मणिपूरमध्ये हिंसक आंदोलन झाले होते. या प्रकरणातील दोषींना मृत्यूदंड किंवा अधिकाधिक कठोर शिक्षा मिळावी, यासाठी सरकारतर्फे प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. मुख्य आरोपींच्या पत्नीसहित चार आरोपींना एका विशेष विमानाद्वारे राज्याबाहेर नेण्यात आले आहे.
मणिपूर पोलिस आणि भारतीय सैन्य दलाने संयुक्त मोहीम राबवून इम्फाळपासून ५१ किमी दूर असलेल्या डोंगराळ जिल्हा असलेल्या चुराचांदपूरमधून संशयितांना पकडले आहे. येथे ३ मे रोजी जातीय हिंसाचार सुरू झाला होता. मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणी ११ आणि नऊ वर्षांच्या दोन मुलींना ताब्यात घेण्यात आले होते. नंतर त्यांना सोडून देण्यात आले. या दोघी मुख्य आरोपीच्या मुली होत्या.
विद्यार्थ्यांच्या हत्येच्या तपासात सरकार सीबीआयची मदत घेईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. तसेच, दोन्ही तरुणांच्या हत्येत सहभागी असणाऱ्या सर्वांना अटक केली जाईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली आहे. या विद्यार्थ्यांच्या मृतदेहांची छायाचित्रे २५ सप्टेंबरला समोर आली होती. त्यानंतर २६ आणि २७ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांनी इम्फाळमध्ये पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. संतप्त जमावाने २८ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या वडिलोपार्जित घरावर हल्ला करण्याचा प्रयत्नही केला. मात्र सुरक्षा दलाने तो हाणून पाडला.
हे ही वाचा:
स्केटिंग रिलेमध्ये भारताची दोन कांस्य पदकांची कमाई
ते जर्मनीच्या अध्यक्षांचे निवासस्थान, बोर्डिंग स्कूल नव्हे!
तजिंदरपालसिंगने केली सुवर्णविजेती गोळाफेक!
आरोपींच्या अटकेविरोधात ‘बंद’चे आवाहन
आयटीएलएफने या अटकेच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी १० वाजता चुराचांदपूर जिल्ह्यात बेमुदत बंदचे आवाहन केले असून त्यांची ४८ तासांत सुटका करण्याची मागणी केली आहे.