सायन -चुनाभट्टी येथे रविवारी दुपारी झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी पाच हल्लेखोरांपैकी चार जणांना अटक केली असून पाचव्या हल्लेखोराचा शोध सुरू आहे. रविवारी दुपारी झालेल्या गोळीबारात सुमित उर्फ पप्पू येरूनकर या गुंडाचा मृत्यू झाला असून एका आठ वर्षाच्या मुलीसह चार जण या हल्ल्यात जखमी झाले होते.
आशुतोष गावंड, सनी पाटील, नरेश पाटील आणि सागर सावंत अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, ते सर्व चुनाभट्टी येथील रहिवासी आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, प्रभाकर पचिंद्रे असे पाचव्या आरोपीचे नाव असून तो सध्या फरार आहे.
रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सायन चुनाभट्टी येथील आझाद गल्ली येथे ही गोलबाराची घटना घडली होती. पाच हल्लेखोरांनी सुमित येरूनकर आणि त्याच्या साथीदारांवर बेछूट गोळीबार केला होता. या गोळीबारात येरूनकर सह पाच जण जखमी झाले होते. जखमीमध्ये आठ वर्षाची त्रिशा शर्मा या मुलीचा समावेश होता. या गोळीबारानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला होता. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसानी जखमींना सायन रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी सुमित उर्फ पप्पू याला मृत घोषित करून इतर चौघांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.
हे ही वाचा:
चोर घोड्यावरून आले, पण कुत्र्यांनी पळवून लावले!
अटल.. अचल.. अविचल.. अटल बिहारी वाजपेयी यांना पंतप्रधान, गृहमंत्र्यांकडून आदरांजली
जयपूर; १४ वर्षीय शाळकरी मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
पराभवानंतर प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात फिरकल्याच नाहीत
या गोळीबाराच्या घटनेनंतर चुनाभट्टी परिसरात एकच खळबळ उडाली होती व परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या हल्ल्यात ठार झालेला सुमित हा गुन्हेगार वृत्तीचा होता. त्याच्यावर खंडणी, गोळीबार, हत्येचा प्रयत्न या सारखे गंभीर गुन्हे दाखल होते. २०१६ मध्ये सुमितला बिल्डरवर गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. तो नुकताच तुरुंगातून सुटून आला होता. सुमित तुरुंगात असताना चुनाभट्टी परिसरात रविवारी घडलेल्या घटनेतील हल्लेखोरांनी स्वतःची टोळी तयार केली होती.
सुमित तुरुंगातून परत आल्यानंतर त्याने पुन्हा आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होता. हे प्रतिस्पर्धी टोळीला नको होते, त्यातून दोन्ही गटात धुसफूस सुरू होती. २ जानेवारी रोजी सुमित याचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या तयारीत असलेल्या सुमितने बॅनरसाठी स्वतःचे फोटो काढण्यासाठी आझाद गल्ली येथील फोटो स्टुडिओ गाठला होता. त्याचवेळी प्रतिस्पर्धी टोळीतील पाच जणांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.