मणिपूरमधील भयंकर व्हिडिओप्रकरणी चौघांना अटक

मुख्य आरोपींपैकी एकाला गुरुवारी अटक

मणिपूरमधील भयंकर व्हिडिओप्रकरणी चौघांना अटक

हळूहळू पूर्वपदावर येत असलेल्या मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र करून धिंड काढल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. व्हिडिओतील महिला या डोंगराळ राज्यातील एका लढाऊ समुदायातील आहेत. जमावाने एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला आणि तिच्या भावाने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता, त्याला त्याला ठार मारण्यात आले. या व्हिडीओप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.

या घटनेमुळे संतापाची लाट उसळली असून राजकीय नेत्यांनी या घृणास्पद कृत्याचा निषेध केला आहे. या घटनेबद्दल विरोधी पक्षांनी संसदेत सत्ताधारी भाजप सरकारलाही घेरले. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एका दिवसानंतर, कुकी समुदायाच्या सदस्यांनी राज्यातील चुरचंदपूर येथे निषेध मोर्चा काढला. आंदोलनकर्त्यांनी काळे कपडे घातले होते. दोन महिलांची धिंड काढून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पुरुषांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

मणिपूर पोलिसांनी जमावाचा भाग असणाऱ्या आणि महिलेवर अत्याचार करणाऱ्या मुख्य आरोपींपैकी एकाला गुरुवारी अटक केली. २६ सेकंदांच्या या क्लिपमध्ये ठळकपणे दिसणाऱ्या आरोपीला थौबल जिल्ह्यातून अटक करण्यात आली. थौबल जिल्ह्यातील नॉन्गपोक सेकमाई पोलिस ठाण्यामध्ये अज्ञात सशस्त्र टोळीच्या विरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे मणिपूर पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाच्या संदर्भात काही तासांनंतर आणखी तीन जणांना अटक करण्यात आली.

या घटनेचा निषेध करताना मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी समाजात अशा घृणास्पद कृत्यांना अजिबात स्थान नसल्याचे सांगत गुन्हेगारांविरुद्ध संभाव्य फाशीच्या शिक्षेसह कठोर कारवाईचे आश्वासन दिले. याबाबत फाशीच्या शिक्षेचाही विचार केला जाईल, अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली.

भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्या. पी. एस. नरसिंहा आणि न्या. मनोज सिन्हा यांचा समावेश असणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने या व्हीडिओची गंभीरपणे दखल घेऊन केंद्र सरकार आणि मणिपूर सरकारने तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले. ‘ही घटना अस्वीराकार्ह आहे. सरकारने खरोखरच पाऊल उचलण्याची आणि कारवाई करण्याची वेळ आली आहे. आम्ही सरकारला कारवाई करण्यासाठी थोडा वेळ देऊ, अन्यथा काहीही होत नसेल तर आम्ही कारवाई करू,’ असे सरन्यायाधीश म्हणाले.

दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून मणिपूरमधील हिंसाचार रोखण्यासाठी तातडीने पावले उचलावीत आणि दोन महिलांना विवस्त्र करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना अटक करावी, अशी मागणी केली आहे. बचावलेल्या महिला व त्यांचे कुटुंबीय तसेच, भीती आणि असुरक्षिततेत जगणाऱ्या इतर महिला आणि मुलींशी संवाद साधण्यासाठी मणिपूरला भेट देण्याचा मनोदय मालीवाल यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय महिला आयोगाने ट्विटर इंडियाला हा व्हिडीओ काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. तर, काँग्रेसचे प्रमुख आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांना हटवावे आणि ईशान्येकडील जातीय हिंसाचारग्रस्त राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केली आहे.

हे ही वाचा:

इर्शाळवाडीमध्ये बचावकार्याला सुरुवात; ५० ते ६० जण अजूनही ढिगाऱ्याखाली

शांतता राखा… मणिपूरमधील वेदनादायी घटनांनंतर आवाहन

विनेश, बजरंगच्या निवडीविरोधात खेळाडू, पालकांचे आंदोलन

जैन साधूंच्या निघृण हत्याकांडा विरोधात विशाल मौन रॅलीचे आयोजन !

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षांनी मणिपूर हिंसाचाराचा मुद्दा उचलून धरला. हिंसाचारग्रस्त मणिपूरवर चर्चेची मागणी करत विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेत गदारोळ केला. केंद्रावर लोकशाहीचे ‘मोबोक्रसी’मध्ये रूपांतर झाल्याचा आरोप करत पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, ‘मणिपूरमध्ये माणुसकीचा मृत्यू झाला आहे’, अशी टिप्पणी केली. मोदींनी हिंसाचारग्रस्त राज्याबद्दल संसदेत बोलावे आणि राष्ट्राला काय घडले ते सांगावे, असे आवाहन खर्गे यांनी केले.

Exit mobile version