राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली आहे. जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आवारात गाडी उभी असताना अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात कारचं नुकसान झालं असून टोपे यांचा चालक गाडीत असल्याचे वृत्त समोर आले आहे.
जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजेश टोपे जिल्हा मध्यवर्ती बँकेत दाखल झाले होते. त्यावेळी राजेश टोपे यांची गाडी जिल्हा बँकेच्या आवारात उभी होती. तेव्हा अज्ञातांनी गाडीच्या समोरील काचेवर दगडफेक केली. तसेच, गाडीवर ऑइलही फेकलं आहे. यावेळी त्यांच्या गाडीचा चालक गाडीतचं होता, अशी माहिती समोर आली आहे.
“दगडफेकीची घटना घडली तेव्हा गाडीचा ड्रायव्हर आतमध्ये होता. त्याच्या जीवावर बेतलं होतं. आम्ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी वरच्या मजल्यावर होतो. तर ड्राईव्हर गाडीत होता,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
हे ही वाचा:
रिंकूनंतर अक्षरची कमाल; भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी २० मालिका जिंकली
मुंबई महापालिकेतील कथित ऑक्सिजन प्लँट घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार
महुआंच्या चौकशीचा अहवाल ४ डिसेंबरला लोकसभेत सादर होणार
२०२८मधील सीओपी यजमानपदासाठी भारत उत्सुक
“असंतुष्ट लोकांनी हे कृत्य केलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी योग्य ती कारवाई केली पाहिजे. ज्या लोकांनी कायदा हातात घेतला असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. जिल्ह्यातील सर्व निवडणूक बिनविरोध पार पडलेली असताना ज्यांनी अशा पद्धतीने कायदा हातात घेऊन काम केलं असेल त्यांना खरंच शिक्षा व्हायला पाहिजे,” असं मत राजेश टोपे यांनी मांडलं. यावेळी त्यांनी माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप केला.