काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा यांना कोळसा घोटाळा प्रकरणात चार वर्षांचा तुरुंगवास

मुलगा देवेंद्र दर्डा यांनाही तुरुंगवास

काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा यांना कोळसा घोटाळा प्रकरणात चार वर्षांचा तुरुंगवास

काँग्रेसचे राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांना दिल्ली विशेष न्यायालयाने दणका दिला आहे.  कोळसा घोटाळा प्रकरणी या दोघांना चार वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे. १३ जुलैला दिल्लीतल्या विशेष न्यायालयाने या प्रकरणात त्यांना दोषी ठरवलं होतं. आता या प्रकरणी विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

जेएलडी यवतमाळ यांना १९९९ ते २००५ या कालावधीमध्ये जे जुने ब्लॉक देण्यात आले होते त्याची माहिती लपवून पुन्हा युपीए सरकारच्या काळामध्ये गैरमार्गाने कंत्राट मिळावल्याचा आरोप होता. या प्रकरणातील ही तेरावी शिक्षा आहे. या संदर्भात पंतप्रधान मनमोहन सिंह यांना लिहिलेल्या पत्रात माहिती लपवण्याचा आरोप करण्यात आला होता. याच आधारावर ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

यात राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा, कोळसा विभागाचे माजी सचिव एच. सी. गुप्ता, के. एस. क्रोफा आणि के. सी. सामरिया, जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांचे संचालक मनोज कुमार जयस्वाल इत्यादींचा समावेश आहे. या प्रकरणात एच. सी. गुप्ता आणि इतर दोन अधिकारी के. एस. क्रोफा आणि के. सी. सामरिया या तिघांना प्रत्येकी तीन वर्षे शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच जेएलडी यवतमाळला न्यायालयाने ५० लाखांचा दंडही ठोठावला आहे.

हे ही वाचा:

…म्हणून एका वर्षात पाच कोटींहून अधिक मनरेगा जॉब कार्डे रद्द

मोदी सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव

राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राला अंतिम विजेतेपद

कारगिल विजय दिवस; दिवस अभिमानाचा आणि गौरवाचा!

सीबीआयने या प्रकरणात २७ मार्च २०१३ रोजी आरोपपत्र दाखल केलं होतं. या आरोप पत्रात या सगळ्यांनी गैरमार्गाने कोळसा खाण आपल्या ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात सीबीआयने २० नोव्हेंबर २०१४ या दिवशी क्लोजर रिपोर्ट सादर केला. मात्र तो स्वीकारण्यास न्यायालयाने नकार दिला आणि प्रकरणाचा तपास सुरु ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणातल्या सर्वांना दिल्ली विशेष न्यायालयाने दोषी ठरवलं आणि त्यानंतर आता आज विजय दर्डांसह इतरांना शिक्षाही सुनावण्यात आली.

Exit mobile version